लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीमध्ये जागा वाटपाचा बराच घोळ चालला तो विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका. जागावाटप लवकरात लवकर करा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील पक्षाच्या नेत्यांना दिले.
शाह आणि नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी रात्री नवी दिल्ली येथे घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. पण, राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. ही एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न नीट हाताळा, जातीय समीकरणांची काळजी घ्या, असेही सांगितले.
सर्व नेत्यांनी प्रयत्न केल्यास विजय निश्चितअन्य नेते निष्क्रिय राहून चालणार नाही. सर्व नेत्यांनी त्यांचे प्रयत्न वाढविले तर महाराष्ट्रात विधानसभा जिंकण्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकणार नाही; असे अमित शाह यांनी बैठकीत सांगितल्याचे सुत्रांनी सांगितले.
प्रदेश कोअर कमिटीची शनिवारी बैठक
दोन पक्ष सोबत घेत सरकार चालवण्याचा अनुभव फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ विधानसभा निवडणुकीचे नियोजन करावे आणि त्या प्लॅनवर २२ जूनला पक्षातील नेत्यांशी सल्लामसलत करावी, असे नड्डा यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे प्रदेश कोअर कमिटीची बैठक २२ जूनला मुंबईत होणार आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे प्रभारी व सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, हे दोघेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.