मुंबई : आम्ही अडीच वर्षांपूर्वी केलेली चूक आता दुरुस्त केली आहे आणि याचा फायदा नक्कीच राज्याला होईल, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता महाविकास आघाडी सरकारला काढला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निमित्त होते सोमवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे.
महामंडळाला हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले, आपण साठ वर्षे हा कारभार करीत आहात. राज्याच्या विकासात योगदान देत आहात. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे आणि हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशिवाय शक्यच होऊ शकत नाही. वागळे इस्टेट येथून हे महामंडळ सुरू झाले. माझा मतदारसंघ वागळे इस्टेट आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात येथून झाली. आता येथे आयटी पार्क उभे राहत आहे. संपूर्ण राज्यात उद्योग यावेत म्हणून आपण प्रयत्न करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. आपले सरकार लोकाभिमुख काम करणारे सरकार आहे. आपण उद्योग क्षेत्राला चालना देणार आहोत.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन म्हणाले की, साठ वर्षांच्या प्रवासात मला येथे काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आपली जमीन आहे. आपल्याकडून प्रेरणा घेत इतर राज्ये काम करीत आहेत. आपल्याला काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. उद्योजकांचा विश्वास आपण संपादन केला आहे. आपण ३० ते ४० लाख लोकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. गेल्या काही काळात आपण १० ते १२ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. कामगार विभागाचे माजी अपर मुख्य सचिव बलदेव सिंह म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुढे नेण्यात प्रत्येकाचा वाटा आहे. आर्थिक विकास दर वाढविण्यात आपण मोलाची भूमिका बजावत आहोत.
गुंतवणूक वाढतेयआज आपल्याकडे गुंतवणूक वाढत आहे. आपल्याला आणखी धोरणे आखायची आहेत. लोकांना रोजगार मिळेल, असे काम आपण करीत आहोत. हीरक महोत्सवाचे औचित्य साधत आपण आणखी धोरणे आणणार आहोत, असे उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी यावेळी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमगोथू श्री रंगा नायक, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रगतीत महाराष्ट्राचा मोठा वाटाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महामंडळाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे आपण उद्योगांत पहिल्या क्रमांकावर आहोत. आता आपण गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपले स्वप्न ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे आहे. याद्वारे आपण देशाच्या फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी हातभार लावणार आहोत.