मुंबई : कारचोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपीवर कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच स्वीकारत असताना मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षातील एका सहायक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली. नागेश अंबादास पुराणिक (वय ४५) असे त्याचे नाव असून २७ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. शुक्रवारी रात्री भायखळा येथील क्राइम ब्रँचच्या कार्यालयाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. पुराणिकने याच कारणास्तव काही दिवसांपूर्वी ४ लाख घेतले होते. तडजोडीअंती ८ लाखांपैकी एकूण ६ लाख स्वीकारले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मालमत्ता कक्षामध्ये कार्यरत असलेल्या एपीआयकडे बीएमडब्ल्यू कार चोरीचा एक गुन्हा तपासासाठी होता. यातील आरोपी व त्याच्या मित्रावर कारवाई न करण्यासाठी त्याने आरोपीची पत्नी हिच्याकडे १२ लाख मागितले होते. त्यावेळी पहिला हप्ता म्हणून त्याने ४ लाख घेतले. त्यानंतर उर्वरित ८ लाख रुपये देण्यासाठी पुराणिक त्यांच्याकडे वारंवार मागणी करू लागला. त्यामुळे फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार फिर्यादी महिला पुन्हा पुराणिककडे जाऊन चर्चा केली. यावेळी तडजोडीत ४ लाख देण्याचे ठरले. त्याने त्यातील दोन लाख रुपये शुक्रवारीच देण्याचा तगादा लावला. त्यानुसार रात्री कार्यालयाच्या परिसरात पुराणिक हा लाचेची रक्कम स्वीकारत असताना पथकाने त्याला अटक केली.
त्याच्या घराची झडती घेण्यात आली असून काही बाबी पुराव्या दाखल जप्त केल्या आहेत. शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
------------------------
क्राइम ब्रांचचे ‘येरे माझ्या मागल्या’ सुरूच
अँटेलिया स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, निरीक्षक सुनील माने व एपीआय रियाज काझी यांना एनआयएकडून अटक झाल्यानंतर खात्यातून गच्छंती करण्यात आली. त्याचबरोबर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी क्राइम ब्रांचमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात सर्व जुन्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, तरीही या शाखेतील ‘आर्थिक’ तडजोडीवर काहीही फरक पडला नसल्याचे पुराणिक याच्या कारनाम्याने स्पष्ट झाले आहे.