Join us  

आमचे सरकार आल्यावर भ्रष्ट कंत्राटदार जेलमध्ये; आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 6:21 AM

महाराष्ट्रातील जनता या सरकारला दणका देणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईची सध्या लूट सुरू आहे. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळालेले नाही. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मुंबईला काही मिळाले नाही. उलट मुंबई महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. 

महापालिका एमएमआरडीएला पैसे देतेय. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि मुंबई अहमदाबाद हे तिन्ही महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सरकार कंत्राटदारांवर पैसे उधळतेय, मात्र महामार्गांवर खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये आमचे सरकार येईल तेव्हा या भ्रष्ट कंत्राटदारांना जेलमध्ये टाकणार, असा इशारा उद्धवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.

येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईची सध्या लूट सुरू आहे. आमचं सरकार आल्यानंतर कुठलेही अधिकारी असतील, शिंदे सरकारमधील मंत्री असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार आहे. मुंबईच्या रस्त्यांची कामांची सखोल चौकशी करणार असा इशारा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

कंत्राटदार कुठेही दिसत नाही, पोलिसांना रस्त्यांवरील खड्डे भरायला लावले जातात. महामार्ग खड्डेमय झाले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची पाहणी करायला हवी. राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकही चांगला रस्ता बनवलेला नाही, अशी टीका आदित्य यांनी केली.

जनता दणका देणार

रस्त्यावरील खड्डे हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा प्रत्येकाशी निगडित विषय आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक कर जातो मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत, दोन वर्षांत खड्डेमुक्त करू असे केवळ बोलले जाते. मागील दोन वर्षे महापालिका निवडणुका झाल्या नाहीत. महाराष्ट्रातील जनता या सरकारला दणका देणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरे