मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या कफ परेड येथील कार्यालयातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. केलेल्या कामाचे उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राजकुमार वरूडे (५३) असे अभियंत्याचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या इमारत दुरुस्तीचे काम करतात. २०१९-२० मध्ये त्यांनी ए वॉर्डमधील एकूण ३६ इमारत दुरुस्तीची कामे केली आहेत. त्यात सदर कामाचे एकूण बिल २२ लाख ६० हजार इतके होते. त्यापैकी फक्त ५ लाख देण्यात आले होते. उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी राजकुमारने १६ फेब्रुवारी रोजी १ लाख रुपयांची लाच मागितली. पैसे द्यायचे नसल्याने तक्रारदार यांनी एसीबी कार्यालय गाठून तक्रार दिली.
एसीबीने १६ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान केलेल्या पडताळणीत राजकुमारने पैसे मागितल्याची खात्री झाली. त्यानुसार बुधवारी सापळा रचून राजकुमारला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करत एसीबी अधिक तपास करत आहेत.