पालिकेचा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:32+5:302021-04-16T04:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वच्छतेबाबत जनजागृती करत पथनाट्य करणाऱ्याचे बिल मंजूर केले म्हणून ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वच्छतेबाबत जनजागृती करत पथनाट्य करणाऱ्याचे बिल मंजूर केले म्हणून ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या पालिकेअंतर्गत येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागासाठी स्वच्छतेवर जनजागृती तसेच पथनाट्याच्या आयोजनाचे काम करतात. त्यांनी गेल्या वर्षी पालिकेच्या विविध ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे २ लाख ६३ हजार इतके बिल झाले होते. हे बिल मंजूर होऊन त्यांना त्याची रक्कमही मिळाली.
मात्र बिल मंजूर केल्याप्रकरणी बिलाच्या १५ टक्के म्हणजे ४० हजार रुपयांची लाच सुतार नामक अभियंत्याने मागितली. सुरुवातीला त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी नव्याने कोटेशन देत, पुन्हा काम मिळविले. सुतारने बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली.
पैसे द्यायचे नसल्यामुळे तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचला. यात, ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.