गैरव्यवहार शक्यच नाही -महापौर
By admin | Published: April 6, 2015 04:44 AM2015-04-06T04:44:09+5:302015-04-06T04:44:09+5:30
महापालिकेचा कारभार हा पारदर्शक आणि सर्व कामेही ई- टेंडरिंग पद्धतीने प्रशासन करीत असल्याने यात कोणत्याही स्वरूपाचा गैरव्यवहार होण्याची शक्यताच नाही, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
मुंबई : महापालिकेचा कारभार हा पारदर्शक आणि सर्व कामेही ई- टेंडरिंग पद्धतीने प्रशासन करीत असल्याने यात कोणत्याही स्वरूपाचा गैरव्यवहार होण्याची शक्यताच नाही, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
अंधेरी - चकाला भागातील कार्डिनल ग्रेशियस मार्ग येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व हायमास्ट दीपस्तंभाचे उद्घाटन स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. तथाकथित आॅडिओ क्लिपनंतर महापौरांचे हे वक्तव्य लक्षवेधी आहे.
महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकहिताच्याच दृष्टीने पालिका सक्षमतेने काम करीत असल्याचे सांगत स्नेहल आंबेकर म्हणाल्या, की सन २०१५-१६ या अर्थसंकल्पीय वर्षात ज्या ज्या विभागात नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी निधीची गरज
आहे, त्या त्या भागात निधीची योग्य ती तरतूद करण्यात आलेली आहे.
मुंबईतील रस्ते, पाणी, घनकचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सक्षम आहे.
नागरिकांना सेवा-सुविधा देण्याकरिता पालिका सदैव कटिबद्ध असून, नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. मुंबईतील जनतेला पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी, सुस्थितीतील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि महिलांचे सक्षमीकरण या बाबींकडे आपण विशेष लक्ष देत असल्याचेही महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)