मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी याचिकाकर्ती जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवून घेतला. आता संबंधित अधिकारी व सचिन वाझेकडे त्याबाबत विचारणा केली जाणार आहे.आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता, त्याबाबत सीबीआय चौकशी करण्याबाबत ॲड. पाटील यांची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यांनी दिलेल्या अहवाल सादर करण्याच्या निर्देशानुसार, सीबीआयचे पथक दिल्लीतून मुंबईत आले. येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी बुधवारी सर्व प्राथमिक बाबींची पूर्तता केली आहे. त्याचप्रमाणे पाटील यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. पाटील यांना या प्रकाराची माहिती कुठून समजली, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार कधी दिली, त्यावर काय कार्यवाही करण्यात आली, याबद्दल सविस्तर जबाब नोंदवून घेतला.तपास अधिकारी आता या आरोपांशी संबधित नमूद पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील यांच्यकडे चौकशी करतील. पत्र लिहिलेले होमगार्डचे महासमदेशक परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवण्यात येईल. त्यासाठी येत्या काही दिवसांत दिल्लीतून वरिष्ठ आयपीएस अधिकारी येणार असल्याचे समजते.
सीबीआयने नोंदविला याचिकाकर्तीचा जबाब; सिंग यांच्यासह वाझेची हाेणार चौकशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 3:23 AM