IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:12 AM2022-10-08T06:12:40+5:302022-10-08T06:13:09+5:30

काही ठिकाणी छापेमारी करत एक कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.

corruption charges against ias officer complaint by ed interrogator also probed | IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी

IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पदाचा दुरुपयोग करत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ईडीने गुजरात केडरचे आयएएस अधिकारी के. राजेश यांच्या विरोधात अहमदाबादच्या न्यायालयात पुरवणी तक्रार दाखल केली आहे. न्यायालयानेही तक्रारीची तातडीने दखल घेतली आहे. या अधिकाऱ्यासोबत भ्रष्टाचारासाठी मध्यस्थ म्हणून काम केलेल्या रफीम मेननचीही आता चौकशी होणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, २०११च्या बॅचचा गुजरात केडरचा आयएएस अधिकारी असलेल्या के. राजेश या अधिकाऱ्याने जिल्हाधिकारीपदावर असताना २७१ लोकांना बंदुकीचा परवाना जारी केला होता.  परवाने जारी करताना त्याने रफीकच्या माध्यमातून पैसे गोळा केले होते.  या परवान्यांपैकी काही परवान्यांसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नकारात्मक अहवाल दिला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत राजेशने परवाना जारी केला होता. 

जानेवारी २०२१ मध्ये एका व्यावसायिकाला बंदुकीचा परवाना देतेवेळी राजेशने  पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी व्यापाऱ्याने गुजरात पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला होता. त्यावेळी राजेशने जिल्हाधिकारी पदाच्या कारकिर्दीत अनेकांकडून परवान्यासाठी पैसे घेतल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर राजेशची बदली करण्यात आली होती. मात्र, तपास पुढे गेला त्यावेळी त्याने केलेल्या भ्रष्टाचाराचे  पुरावे पुढे आले व १३ जुलै रोजी सीबीआयने त्याला अटक केली.

१ कोटी ५५ लाखांची मालमत्ता जप्त

या प्रकरणाची आर्थिक व्याप्ती मोठी असल्यामुळे आणि यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने ६ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी करत त्याची एक कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली. सध्या राजेश न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी तक्रारीनंतर त्याची आणखी चौकशी केली जाणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: corruption charges against ias officer complaint by ed interrogator also probed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.