पोस्ट भरतीत भ्रष्टाचाराचा आरोप
By admin | Published: March 1, 2015 12:31 AM2015-03-01T00:31:56+5:302015-03-01T00:31:56+5:30
पोस्ट खात्याच्या नुकत्याच पार पडलेल्या ‘पोस्टल सॉर्टिंग असिस्टंट’ पदाच्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही उमेदवारांंनी केला आहे.
मुंबई : पोस्ट खात्याच्या नुकत्याच पार पडलेल्या ‘पोस्टल सॉर्टिंग असिस्टंट’ पदाच्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही उमेदवारांंनी केला आहे. या भरतीच्या निकालाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही संबंधित उमेदवारांनी शुक्रवारी दिला आहे.
संबंधित पदासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केला होता. नियमाप्रमाणे आवेदनाची तपासणी केल्यानंतर ११ मे २०१४ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. ३० आॅक्टोबर २०१४ रोजी पोस्टाच्या संकेतस्थळावर परिक्षेचा निकाल जाहीर झाला. शिवाय ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान संगणक चाचणीही झाली. ७ जानेवारी २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. मात्र ९ जानेवारीला अचानक प्रशानसाने प्रसिद्ध केलेली निकालाची प्रत संकेतस्थळावरून काढण्यात आली. संगणकाच्या तांत्रिक कारणांमुळे प्रसिद्ध झालेली अंतिम यादी चूकीची असल्याचा खुलासा पोस्टाने केला. मात्र याप्रकरणी अधिक माहिती विचारली असता पोस्ट विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. परिणामी संबंधित उमेदवारांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)