मालमत्ता कर थकबाकीवरून नगरसेवक-प्रशासनामध्ये खडाजंगी; २ टक्के दंडमाफ करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:49 AM2021-03-25T02:49:17+5:302021-03-25T02:49:40+5:30
१९ हजार कोटींची थकबाकी; दोन टक्के दंडमाफी देण्याचा मुद्दा ठरतोय कळीचा
मुंबई : हॉटेल मालक, विकासकांना सूट दिल्याने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना विलंबाचा दोन टक्के दंड माफ करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली आहे. मात्र, विधी खात्याचा सल्ला घेऊन कायद्यात सुधारणा केल्यानंतरच यावर विचार करू, अशी ठाम भूमिका प्रशासनाने मांडली आहे. त्यामुळे मालमत्ता करावरील दंड आकारणीवरुन नगरसेवक आणि प्रशासनामध्ये जुंपली आहे.
मालमत्ता कराचे सुमारे १९ हजार कोटी थकीत आहेत. तर कोविड काळात बिल पाठविणे लांबणीवर पडल्याने महापालिकेने डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बिल पाठवून तीन महिन्यांची मुदत थकबाकीदारांना दिली होती. त्यानंतर पालिकेने दोन टक्के दंड लावण्यास सुरुवात केल्यामुळे नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, दंड माफीची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ताठर भूमिका घेतली आहे.
बुधवारी याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. स्थायी समितीच्या निर्देशानंतरही दंड वसूल करून प्रशासनाने मुजोरपणा दाखवल्याची नाराजी समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केली. तर धनदांडग्यांना मालमत्ता करात सूट मिळते तर कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या सामान्य करदात्यांवर कारवाई का?, असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. भाजपचे भालचंद्र शिरसाट, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेता राखी जाधव यांनी दंड रद्द करण्याची मागणी केली.
कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय
थकीत मालमत्ता कर वसुलीबाबत दंडात्मक कारवाईची पालिका कायद्यातच तरतूद असल्याचा मुद्दा मांडत प्रशासनाने या कारवाईचे समर्थन केले. विधी खात्याचा सल्ला दोन दिवसात घेऊन कायद्यात तशी सुधारणा केल्यावरच दंडवसुली थांबवता येऊ शकेल, असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्पष्ट केले. तर प्रशासनाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी दंड आकारण्याच्या कारवाईला स्थगिती द्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
थकबाकीदारांवर अशी झाली कारवाई
- वर्सोवा येथील कर थकविणाऱ्या सोसायटीची ८७ लाख २४ हजार ४५२ इतकी थकबाकी आहे. त्यांच्या चार जलजोडण्या खंडीत करण्यात आल्या.
- ''के पश्चिम'' येथे एका मालमत्तेवर ९७ लाख ३८ हजार ४२० एवढी थकबाकी होती. जलजोडणी खंडीत करण्यात आली.
- मालाड पश्चिम, राइट चॅनल कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्या अख्यत्यारितील एका मालमत्तेवर दोन कोटी ६५ लाख १० हजार ४०० एवढी थकबाकी होती. जलजोडणी खंडीत करण्यात आली.
- माटुंगा, के नप्पू इमारत या निवासी इमारतीवर एक कोटी ३९ लाख थकबाकी होती. जलजोडणी खंडीत करण्यात आली आहे.
- गोवंडी परिसरातील एका मालमत्तेवर मालमत्ता कराची थकबाकी होती. संबंधितांच्या वाहनांना जॅमर बसविण्यात येऊन वाहन स्थानबध्द करण्यात आले. या कारवाईनंतर २९ लाख रुपये भरले.