मालाड, लोअर परळच्या पासपोर्ट केंद्रांत भ्रष्टाचार; CBI चे देशभरात ३३ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:00 AM2024-06-30T06:00:43+5:302024-06-30T06:01:05+5:30
सीबीआयचे देशभरात ३३ ठिकाणी छापे; ३२ जणांविराेधात गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘सीबीआय’ने मुंबईतील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात शनिवारी मुंबई आणि नागपूरमधील ३३ ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी ३२ जणांविरोधात १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात मालाड आणि लोअर परळच्या पासपोर्ट सहायक तसेच वरिष्ठांचा समावेश आहे. त्यांनी नेमलेल्या १८ पासपोर्ट सुविधा एजंटांनाही आरोपी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्रांवर पासपोर्ट सहायक आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात आरोपी कार्यरत आहेत. ते एजंट्सच्या नियमित संपर्कात होते.
अपुऱ्या/अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करण्याच्या बदल्यात किंवा अर्जदारांच्या तपशिलांमध्ये फेरफार करून गैरलाभ मिळवत असल्याचा आरोप आहे. २६ जूनला पासपोर्ट सेवा कार्यक्रम विभागाच्या दक्षता अधिकाऱ्यांनी परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रात एक संयुक्त तपासणी केली. या जॉइंट सरप्राईज चेक दरम्यान संशयित अधिकाऱ्यांच्या ऑफिस डेस्क आणि मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली हाेती.
संशयास्पद व्यवहार, चॅट्स
दस्तऐवज, सोशल मीडिया चॅट्स आणि संशयित अधिकाऱ्यांच्या ‘यूपीआय’ विश्लेषणातून पासपोर्ट सेवा केंद्राचे काही अधिकारी आणि पासपोर्ट सुविधा एजंट्सद्वारे अवाजवी लाभाची मागणी आणि स्वीकृती दर्शवणारे संशयास्पद व्यवहार उघड झाले.
अधिकारी-दलाल यांच्यात संगनमत
- संशयित अधिकारी विविध पासपोर्ट सुविधा एजंट तसेच दलाल यांच्या संगनमताने, पासपोर्ट सुविधा एजंट आणि दलाल यांच्याकडून स्वत:च्या बँक खात्यांमध्ये किंवा त्यांच्या जवळच्यांच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक लाभ मिळवत होते.
- सीबीआयने मुंबई आणि नाशिक येथे आरोपी असलेले अधिकारी आणि एजंट यांच्याशी संबंधित सुमारे ३३ ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पासपोर्ट कागदपत्रांशी संबंधित अनेक दाखले/डिजिटल पुरावेही जप्त केले.