Join us

विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार, दोन हजारांची बॅग ६,८०० रुपयांना; संजीव जयस्वाल चौकशीला गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 6:01 AM

मुंबई : कोरोनाकाळात उपचाराच्या औषधाबरोबर विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कोविड मृतदेहासाठीची बॅग कंपनी ...

मुंबई : कोरोनाकाळात उपचाराच्या औषधाबरोबर विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कोविड मृतदेहासाठीची बॅग कंपनी दोन हजार रुपयांना देत असताना पालिकेला तिला पुरवठा करणाऱ्या कंपनीने मात्र एकेक बॅग सहा हजार ८०० रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. ईडी पथक अधिक तपास करत आहे. महापौरांच्या सूचनेनुसार हे कंत्राट देण्यात आले होते.

टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचे आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून कंत्राट देणे क्रमप्राप्त असते. मात्र, ईडीने केलेल्या तपासात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना आणि या कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध नसताना या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह अन्य अधिकारी रडारवर आले आहेत. 

कोविडची औषधे पालिकेला ज्या दरांमध्ये मिळत होती, त्याच्या २५ ते ३० टक्के कमी दराने ती बाजारात उपलब्ध होती, असे या ईडीला आढळले. पालिकेच्या बिलामध्ये दाखवण्यात आल्यापेक्षा ६० ते ६५ टक्के कमी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते. जे डॉक्टर काम करत नव्हते, अशांची नावेही कंपनीकडून बिलात दाखविण्यात आली होती. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटने वरळीतील एनएससीआय जम्बो कोविड सेंटर आणि दहिसर जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. 

संजीव जयस्वाल चौकशीला गैरहजरसनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी बुधवारी टाकलेले छापेसत्र पाच तास चालले. ईडीने जयस्वाल यांना समन्स बजावत गुरुवारी चाैकशीसाठी ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयात बोलावले होते. मात्र, ते काही कामानिमित्त हजर झाले नाहीत. त्यांना पुन्हा लवकर बोलाविण्यात येईल. त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडे वेळ मागितला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंमलबजावणी संचालनालय