‘आरटीओ’तील भ्रष्टाचाराला चाप; नागरिकांचा ‘फेसलेस’कडे ओढा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:14 AM2023-12-16T10:14:40+5:302023-12-16T10:15:09+5:30
परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार संपविण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षेतून वाहन परवाने देणे सुरू केले.
मुंबई : बनावट पावत्या, सह्या, नोंदणीच्या माध्यमातून काही दलाल भ्रष्टाचार करीत होते. परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार संपविण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षेतून वाहन परवाने देणे सुरू केले.
काही गैरप्रकार समोर आले होते. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी कॅमेऱ्याच्या नजरेत फेसलेस सुविधा राज्यभरात राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या पारदर्शी पद्धतीने वाहन चालविण्याचे शिकाऊ परवाने कॅमेऱ्याच्या नजरेतील परीक्षेतून मिळत आहे. त्यामुळे दलालांनाही चाप बसला आहे.
परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षेतून शिकाऊ वाहन परवाने देणे सुरू केले. त्यासाठी परिवहन खात्याने राष्ट्रीय माहिती केंद्राकडून वाहन व सारथी-४ या संगणकीय प्रणालीत बदल करून घेतले; परंतु राज्यातील काही दलालांनी व्यवस्थेतील दोषांचा फायदा घेत बरेच गैरप्रकार केले. एका अंधालाही हा परवाना मिळाला होता. या प्रकरणाची तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दखल घेतली. घरबसल्या कॅमेऱ्याच्या नजरेत परीक्षेचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला.
६० टक्के प्रतिसाद ऑनलाइन लर्निंगसाठी :
फेसलेस सुविधेमुळे घरबसल्या लर्निंग लायसन्सची परीक्षा होत आहे. त्याला ६० टक्के प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून नागरिकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा. - विनय अहिरे, प्रवक्ता, परिवहन विभाग
आक्षेपार्ह हालचाली, उमेदवार बाद :
राज्यभरात कॅमेऱ्याच्या नजरेत ऑनलाइन पद्धतीने वाहन परवान्याची सोय झाल्यास उमेदवारांना घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देताना स्वत:च्या संगणकावरील ‘वेब कॅम’ सुरू करावा लागेल.
तो सुरू असतानाच ही परीक्षा होईल.
परीक्षेदरम्यान उमेदवार कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाहेर गेला वा परीक्षेदरम्यान आक्षेपार्ह हालचाली करताना दिसल्यास ‘सॉफ्टवेअर’ संबंधिताला परीक्षेतून बादच करेल.