Join us

अन्नसुरक्षा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी

By admin | Published: March 05, 2016 2:23 AM

अन्नसुरक्षा योजनेतील रेशनिंगच्या धान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अभिनव संस्थेने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : अन्नसुरक्षा योजनेतील रेशनिंगच्या धान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अभिनव संस्थेने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला चौकशीचे आदेश देऊन चार महिने उलटले असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संस्थेने मंगळवारी, ८ मार्चला मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष संतोष पुजारी यांनी सांगितले की, या भ्रष्टाचारात ५ रेशनिंग अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचे सर्व पुरावे संस्थेने केंद्र शासनाच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाला दिले आहेत. त्याची दखल घेत विभागाने राज्याच्या खाद्य आणि नागरिक पुरवठा विभागाला २ नोव्हेंबर २०१५ रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत; शिवाय चौकशीचा अहवाल मागवला असून, त्याची एक प्रत संस्थेला पाठवण्यास सांगितले होते. मात्र केंद्राच्या आदेशाला चार महिने उलटले असूनही यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आझाद मैदानावर धडक मोर्चा घेऊन कार्यवाहीची मागणी करण्यात येईल. पुजारी यांनी सांगितले की, मुंबईतील कोणत्याही शिधावाटप दुकानामध्ये अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ प्रमाणे अन्न धान्य वाटपासाठीच्या पारदर्शकतेसाठी आवश्यक असणारे दैनंदिन विक्री नोंदवही ठेवलेली नाही. कार्डधारकास प्रति व्यक्ती ५ किलो अन्नधान्य मिळण्याचा अधिकार आहे. मात्र बहुतेक दुकानांत एका कार्डमागे ५ किलो धान्य देऊन कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे पुरावेही संस्थेकडे आहेत. याबाबत स्थानिक रेशनिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, दुकानदारावर कारवाई टाळली जाते. त्यामुळे सरकारने अन्नसुरक्षा योजनेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पुजारी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)