Join us  

तलाव सफाईत लाखोंचा भ्रष्टाचार

By admin | Published: June 28, 2017 3:37 AM

तलावाच्या भिंती बांधण्यावर अडीच कोटी रुपये खर्च झाल्याने चेंबूरचा तीन तलाव (चरई तलाव) दोन वर्षांपूर्वी चर्चेत आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तलावाच्या भिंती बांधण्यावर अडीच कोटी रुपये खर्च झाल्याने चेंबूरचा तीन तलाव (चरई तलाव) दोन वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. सध्याही या तलावाच्या कामामध्ये भ्रष्टाचार सुरूच असून दरवर्षी या तलावाच्या सफाईसाठी पालिकेकडून १५ ते २० लाखांचा निधी मंजूर केला जात आहे. तथापि, दरवर्षी ही सफाई अर्धवटच केली जात असल्याने तलावातील घाण तशीच पडून असते. त्यामुळे गेल्या १० वर्षांतील या तलावाच्या खर्चाची तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता रहिवाशांकडून करण्यात येत आहे. चेंबूर परिसरातील रहिवाशांसाठी एकमेव असलेल्या या चरई तलावात गणेश उत्सवादरम्यान घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होते. उत्सवादरम्यान आणि इतर काही कार्यासाठी या तलावावर नेहमीच नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावाचा ‘मेकओव्हर’ केला. यात तलावाच्या भिंती आरसीसी पद्धतीने बांधण्यात आल्या. तर आजूबाजूला कुंड्यांमध्ये झाडे लावण्यात आली. याशिवाय तलावाच्या भोवताली लाइट लावण्यात आले. मात्र दोन वर्षांत या लाइट कधी सुरूच झाल्या नाहीत. सध्या तर या सर्व लाइट्स गायब झाल्या आहेत. पालिकेच्या या निकृष्ट कामाचा रहिवाशांनीदेखील विरोध केला. त्यामुळे माजी उपमहापौर अलका केरकर यांनीदेखील या तलावाला भेट देऊन तलावाची पाहणी केली होती. मात्र त्यानंतर देखील ठेकेदार आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई झालेली नाही. अशाच प्रकारे दरवर्षी पालिका या तलावाच्या साफसफाई आणि डागडुजीसाठी १० ते १५ लाख रुपये खर्च करते. पालिकेला तलावाच्या सफाईला पावसाळा सुरू झाल्यावरच मुहूर्त मिळत असल्याने आजपर्यंत या तलावाची कधीही पूर्ण सफाई झाली नाही. जून महिना सुरू झाल्यानंतर कंत्राटदार पंप लावून तलावाचे पाणी बाहेर काढतो. पावसाळ्याची सुरुवात असल्याने दरवर्षी कंत्राटदार सफाई अर्धवटच ठेवून पळ काढतो. केवळ दिखावा म्हणून चार दिवस या तलावातील गाळ काढला जातो. मात्र पालिकेकडून कंत्राटदार पूर्ण बिल घेतो. त्यामुळे अशा कंत्राटदारावर आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. शिवाय पालिकेने मे महिन्यात या तलावाच्या सफाईला सुरुवात केल्यास पावसाळा सुरू होईपर्यंत तलावाची चांगल्या पद्धतीने सफाई होईल, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.