मंत्रालयातील नूतनीकरणात भ्रष्टाचार; कामे न करताच दिली बिले
By यदू जोशी | Published: September 20, 2018 01:18 AM2018-09-20T01:18:55+5:302018-09-20T06:43:22+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकार
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांच्या मंत्रालयातील दालनाच्या नूतनीकरण कामात ४६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब विभागाच्या दक्षता पथकाने केलेल्या चौकशीत समोर आली आहे.
या संदर्भात भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार दक्षता विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी चौकशी करून अहवाल विभागाकडे सादर केला. नूतनीकरणाचे काम तुकडे पाडून कंत्राटदार विश्राम माने यांच्या मे.विश्राम एंटरप्रायजेस या फर्मला देण्यात आले होते. प्रत्यक्षात कामे न करताच कंत्राटदारास जादाची रक्कम कशी अदा करण्यात आली याचा लेखाजोखा चौकशी अहवालात मांडण्यात आला आहे.
मंत्रालयातील कामांची जबाबदारी असलेल्या शहर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या मनोरा आमदार निवासातील घोटाळ्याप्रकरणी सध्या निलंबित आहेत. उपअभियंता असलेले के.आर.जाधव निवृत्त झाले आहेत. तर, शाखा अभियंता नारायण बासुंदे यांना उपअभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. वांद्रे शासकीय वसाहतीचा कारभार त्यांना दिला आहे.
आशिषकुमार सिंग यांच्या दालनाचा क्रमांक ६१८ होता. तेथे मंजूर काही कामांवरील निधी हा सार्वजनिक बांधकाम सेवा केंद (मंत्रालय शाखा) तसेच विस्तारित इमारतीतील पाचव्या मजल्यावरील कॉमन प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीसाठी खर्च केल्याचे चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षता त्या ठिकाणीही कामे केली नाहीत मग पैसा कुणाच्या खिश्यात गेला असा प्रश्न निर्माण होतो.
कामे न करताच दिलेली जादाची रक्कम
इम्पोर्टेड वॉलपेपर कामापोटी २१ हजार ६०५ रुपये
लाकडी फर्निचर बसविणे १ लाख ४ हजार ४६१ रुपये
अॅकॉस्टिक पॅनेल बसविणे १ लाख ६७ हजार ९८२ रुपये
फाल्स सिलिंग लावणे आणि फ्लोरिंग करणे८८ हजार ८५१ रुपये
फर्निचर अधिक ग्लास पॅनेल बसविणे १ लाख ७२ हजार ८१५
बेसिक वॉल पॅनेल बसविणे ५० हजार ५९६ रुपये.
लाखोंचे वॉलपेपर गेले कुठे?
प्रधान सचिवांच्या दालनात ९.२७ लाख रुपये किमतीचे सोनेरी वॉलपेपर लावल्याचे दाखविले आहे.
तथापि, प्रत्यक्षात त्यावर ५० हजार रुपयेही खर्च आलेला नाही, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे होते. हे काम आजमितीस अस्तित्वातच नाही.