निर्बीजीकरणातही भ्रष्टाचार

By admin | Published: July 4, 2014 11:53 PM2014-07-04T23:53:56+5:302014-07-04T23:53:56+5:30

भटका कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला दिली जाणारी इमीनो ग्लो बी नीन्स ही लस कळवा रुग्णालयात उपलब्ध नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली

Corruption in Nirjijivaran also | निर्बीजीकरणातही भ्रष्टाचार

निर्बीजीकरणातही भ्रष्टाचार

Next

ठाणे : भटका कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला दिली जाणारी इमीनो ग्लो बी नीन्स ही लस कळवा रुग्णालयात उपलब्ध नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. विशेष म्हणजे भटक्या कुत्र्यांवर महागड्या शस्त्रक्रिया करूनही पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे सांगून या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या बैठकीत केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे.
मुंब्रा आणि ठाण्यातील महागिरी भागांत दोघांना कुत्रा चावल्याचे प्रकरण शुक्रवारच्या स्थायीच्या बैठकीत चांगलेच रंगले. कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला दिली जाणारी इमीनो ग्लो बी नीन्स ही लस प्रशासनाकडे उपलब्ध आहे का, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर रुग्णालय प्रशासनाकडून तशा प्रकारची लस आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे वार्षिक औषधे घेताना या लसीचा त्यामध्ये उल्लेखसुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे. केवळ ही लस महाग असल्याने आपण ती घेतली नसल्याचे उत्तर कळवा रुग्णालयाचे प्रमुख आर. कोरडे यांनी दिली. आता यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो सभागृहात सादर करू, असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. त्यामुळे सदस्य आणखीनच संतापले. रुग्ण मेल्यावर त्याच्यावर उपचार सुरू करून काय उपयोग, असा संतप्त सवाल संजय भोईर यांनी उपस्थित केला. ही लस उपलब्ध नसेल तर त्यासाठी प्रस्तावाची वाट न बघता आवश्यक असलेला निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्वपक्षीय सदस्यांनी दिले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी ही लस तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सभागृह शांत झाले.
शहरात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरूनसुद्धा सदस्य आक्रमक झाले. त्यांनी आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांना चांगलेच धारेवर धरले. यावर केंद्रे यांनी महापालिका हद्दीत २००४ पासून निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ४३ हजार ४०० कुत्र्यांवर ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले. परंतु, आयुक्तांकडे झालेल्या बैठकीनंतर आता शहरातील उर्वरित पाच ते सात हजार कुत्र्यांवर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा दावा त्यांनी केला. परंतु, नगरसेवक नारायण पवार यांनी केंद्रेंचा दावा फोल ठरवून कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्यानंतरही शहरात त्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप केला. यासंदर्भात त्यांनी कुत्रीला झालेल्या पिलांचा मोबाइलमधील व्हिडीओसुद्धा सभागृहासमोर सादर केला. तसेच मुंबई आणि नवी मुंबई महापालिका अनुक्रमे ७०० आणि ५०० रुपये एका कुत्र्यामागे खर्च करीत असताना ठाणे महापालिका एका कुत्र्यामागे १२०० रुपये का खर्च करते, असा सवाल उपस्थित केला. त्यांचाच मुद्दा धरून म्हस्के यांनी निर्बीजीकरणाची प्रक्रिया न करताच ठेकेदाराची बिले काढली जात असल्याचा आरोप करून या संपूर्णच प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य अधिकारी केंद्रे यांच्यावर हा आरोप झाल्याने त्यांनी त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. अखेर, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर सभागृहातील गोंधळ शांत झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Corruption in Nirjijivaran also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.