Join us  

मोकळ्या श्वासाचा खर्च ५० लाख कोटी

By admin | Published: May 14, 2016 2:32 AM

ना विकास क्षेत्रांतील तीन हजार हेक्टर जागा विकासासाठी खुली केल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांच्या भुवया उंचाविल्या आहेत़ मात्र दाटीवाटीने उभ्या

मुंबई : ना विकास क्षेत्रांतील तीन हजार हेक्टर जागा विकासासाठी खुली केल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांच्या भुवया उंचाविल्या आहेत़ मात्र दाटीवाटीने उभ्या व गजबलेल्या मुंबईचा श्वास मोकळा करण्यासाठी ५० लाख कोटी रुपये खर्च येणार आहे़ हा खर्च आवाक्याबाहेर असल्याने भूखंडांवरील आरक्षणात सूट देण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबिले असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी आज स्पष्ट केले़ मुंबईत पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रफळ मोकळ्या जागा म्हणून आरक्षित आहेत़ यापैकी २५ टक्क्यांहून कमी जागा पालिकेच्या ताब्यात आहे़ उर्वरित भूखंड खाजगी मालकांकडून खरेदी करून त्यावर मैदाने व उद्याने तयार करण्यासाठी सुमारे ५० लाख कोटी रुपये खर्च येणार आहे़ एवढा पैसा उभा करणे अशक्य असल्याने आरक्षित भूखंडांतील काही भाग मोकळा होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र ना विकास क्षेत्र व इतर भाग असे सुमारे तीन हजार हेक्टरचा विकास होत असताना यातून पाणथळाची जागा, नैसर्गिक वने, खारफुटी, सागरी नियंत्रण क्षेत्र एक या क्षेत्रात येणाऱ्या भूखंडांवर विकास होणार नाही़ अशी सुमारे दहा हजार ३५१ हेक्टर जागा नैसर्गिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे़ यावर भविष्यातही कोणत्याप्रकारचा विकास केला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे़ (प्रतिनिधी)