Join us

दोन मेट्रोंच्या साफसफाईचा खर्च प्रतिवर्षी २८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 1:26 AM

अंधेरी ते दहिसर, दहिसर ते डी.एन. नगर मार्गिकांसाठी तयारी

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढील वर्षी अंधेरी ते दहिसर (मेट्रो ७) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो २ अ) या दोन मार्गांवरील मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यावेळी या मार्गिकांवरील स्टेशन, मेट्रो ट्रेन, डेपो आदींच्या स्वच्छतेसाठी वर्षाकाठी २८ कोटी रुपये खर्च होतील अशी एमएमआरडीएची अपेक्षा आहे. तीन वर्षे हे काम करण्यासाठी खासगी कंत्राटदार नियुक्त केला जाणार असून त्यासाठी ८४ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

मेट्रो प्रकल्प २ अ (१८.६० किमी) आणि मार्ग ७ (१६.४७ किमी) या दोन्ही मार्गिका डिसेंबर, २०२० पर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे तो मुहूर्त किमान तीन ते सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, या मार्गांवर मेट्रो सुरू झाल्यानंतर त्यांचे संचलन आणि अन्य कामांची पूर्वतयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे. या मार्गिकांवर ३० स्टेशन्स आहेत. तिथल्या साफसफाईच्या कामांसाठी ४ व्यवस्थापक, ९१ पर्यवेक्षक, ४०८ पुरुष आणि २०८ महिला सफाई कर्मचारी अशा ७०७ जणांची गरज असेल. चारकोप डेपोच्या सफाई कामांसाठी एक व्यवस्थापक, ६ पर्यवेक्षक, ३४ पुरुष आणि १७ महिला सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल. तर, ट्रेनच्या स्वच्छता कामांसाठी १ मॅनेजर, सहा पर्यवेक्षक, २८ कुशल आणि ३६ अकुशल कामगारांची भरती करावी लागणार आहे.

ही कामे खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जाणार असून त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा गणवेश, त्यांचे ओळखपत्र, बॅच, आरोग्य विमा, स्वच्छता कामांसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदारावरच असेल. काही सफाईची कामे यांत्रिक पद्धतीनेही करावी लागणार आहेत. ही कामे करताना कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही. तसेच, प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी कंत्राटदारावरच असेल.कोरोनाच्या संकटानंतर स्वच्छतेबाबतच्या निकषांमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. मेट्रो सुरू करताना कशा पद्धतीने सुरक्षेची यंत्रणा राबवायची याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे एमएमआरडीएने काढलेल्या या निविदा भरताना कंत्राटदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कामाचे आॅडिट आणि हलगर्जीपणासाठी दंडमेट्रो रेल्वेपासून ते स्टेशनपर्यंत, स्वच्छतागृहांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत, मेट्रो स्टेशनच्या छतापासून ते प्लॅटफॉर्मपर्यंत, सीसीटीव्हींपासून ते एसी युनिटपर्यंत मेट्रो मार्गिकेवरील प्रत्येक घटकाच्या स्वच्छतेसाठी निकष ठरवून देण्यात आले आहेत. पेस्ट कंट्रोल, जल आणि मलनिस्सारण मार्गिकांची स्वच्छता, कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठीसुद्धा नियमावली आहे. त्यात हलगर्जी झाल्यास एक हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई कंत्राटदारावर होऊ शकते. तसेच, कामाचा दर्जा कायम राहावा यासाठी परफॉर्मन्स आॅडिटही केले जाणार आहे. प्रत्येक निकषासाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :मेट्रो