लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात काेरोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने कोरोनावर गुणकारी ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीरच्या किमती कमी करुन नियंत्रणात आणल्या आहेत. ४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किंमती नियंत्रण आदेश २०१३’अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने एपिडेमिक अॅक्ट १८७९ तसेच अन्य कायद्यांचा अवलंब करून रेमडेसिवीर इंजेक्शन मास्क, सिटी स्कॅन चाचणी, कोरोना चाचणी तसेच रुग्णालयातील बेडचे व उपचारांचे दर नियंत्रित केले आहेत.
* ...तर तक्रार करा
ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळा बाजार होत असल्यास त्याबाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास किंवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले.
..........................