जीवनावश्यक वस्तूंचे दर भिडले गगनाला; तूर तसेच मूगडाळ १४० रुपयांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:26 AM2020-04-02T02:26:05+5:302020-04-02T02:26:34+5:30
किरकोळ मार्केटमध्ये ग्राहकांची लुबाडणूक
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनामुळे जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडू लागले आहेत. तूरडाळीसह मूगडाळीचे दर १०० ते १४० रुपये किलो झाले असून गहू, ज्वारी, वाटाणा यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये भाजीपालाही एपीएमसीपेक्षा दुप्पट दराने विकला जात असून ग्राहकांची पिळवणूक सुरू झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन २ ते ३ हजार वाहनांमधून १० ते १५ हजार टन कृषी माल विक्रीसाठी येत असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून आवक तीनपट कमी झाली आहे. धान्य मार्केटमध्ये वस्तूंचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये २० मार्चला २४ ते २७ रुपये किलो दराने विकला जाणारा गहू २५ ते ३६ रुपयांवर गेला आहे. किरकोळ मार्केटमध्ये गहू ३५ ते ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये चणाडाळ ७० ते १०० रुपये किलो, हिरवा वाटाणा १३० ते १६० रुपये किलो दराने विकला जात आहे.
बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवक कमी झाली आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे होलसेल मार्केटमध्ये १० ते १५ टक्के दर वाढले आहेत. - नीलेश वीरा, संचालक,बाजार समिती धान्य मार्केट