पायाभूत सुविधांसाठी ७,५०० कोटी होणार खर्च

By admin | Published: November 3, 2015 01:00 AM2015-11-03T01:00:29+5:302015-11-03T01:00:29+5:30

नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे. दोन टप्प्यांत नैनाच्या संपूर्ण परिसराचा विकास करण्याचे सिडकोने ठरविले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचा प्रारूप विकास

The cost of infrastructure will be 7,500 crores | पायाभूत सुविधांसाठी ७,५०० कोटी होणार खर्च

पायाभूत सुविधांसाठी ७,५०० कोटी होणार खर्च

Next

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
नैना क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे. दोन टप्प्यांत नैनाच्या संपूर्ण परिसराचा विकास करण्याचे सिडकोने ठरविले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचा प्रारूप विकास आराखडा सिडकोने तयार केला आहे. या पहिल्या टप्प्यात केवळ पायाभूत सुविधांवर तब्बल ७,५00 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
नैना क्षेत्रात २७0 गावांचा समावेश आहे. या क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ५६१ चौरस कि.मी. इतके असल्याने या विस्तीर्ण परिसराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण नैना क्षेत्राचा दोन टप्प्यांत विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल परिसरातील २३ गावांचा समावेश करून विकासाचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. या विकास आराखड्याचा सुधारित मसुदा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
नैना क्षेत्रात सिडको घरे बांधणार नसून, केवळ पायाभूत सुविधा पुरविणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांवर सिडको तब्बल ७,५00 कोटी रुपये खर्च करणार आहे. लॅण्डपुलिंग योजनेंतर्गत भूधारकांकडून वर्ग होणाऱ्या जमिनी विकून सिडको आपला हा खर्च वसूल करणार आहे. किमान १० हेक्टर जमीन एकत्रिक करून विकास प्रकल्पाचा प्रस्ताव आणणाऱ्या भूधारकाला यापैकी ४0 टक्के जमीन सिडकोला द्यावी लागणार आहे. यापैकी २५ टक्के जमिनीवर शहरी व आजूबाजूच्या परिसरासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. तर उर्वरित २५ टक्के जमीन सिडको स्वत:च्या लॅण्ड बँकेत ठेवणार आहे. लॅण्ड बँकेतील या जमिनी विकून सिडकोनंतर आपला खर्च वसूल करणार आहे. नैना योजनेत सहभागी न होता जमिनीचा स्वत:च विकास करणाऱ्या भूधारकाकडून आॅफ साइट सिटी सेवा वितरण (ओसीएएसडीसी) शुल्काच्या माध्यमातून सिडको पायाभूत सुविधांवर झालेला खर्च वसूल करणार आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या विकासाचे नियोजन
नैनाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासाला सात वर्षांचा कालावधी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीही बराच कालावधी लागणार आहे. असे असले तरी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत येणाऱ्या क्षेत्राचे दर पाच वर्षांनी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. त्याआधारे नैनाच्या उर्वरित क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याची सिडकोची योजना आहे.

नैनाच्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्याला पुढील महिनाभरात राज्य सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी प्राप्त होताच पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.
- व्ही. राधा,
सहव्यवस्थापकीय संचालिका.

Web Title: The cost of infrastructure will be 7,500 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.