वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचा खर्च गेला १८ हजार कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:39 AM2024-07-28T10:39:02+5:302024-07-28T10:39:34+5:30
राज्य सरकारची ७ हजार काेटींच्या वाढीव खर्चाला मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या खर्चात प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ७ हजार २९२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. आता प्रकल्पाचा खर्च ११ हजार ३३३ कोटी रुपयांवरून १८ हजार १२० कोटी रुपयांवर गेला आहे. या वाढीव खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १७.७ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्यात येत आहे. सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी ऑगस्ट २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोनामुळे लागलेली टाळेबंदी, तसेच कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने प्रकल्पाचे काम थांबले होते. मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पाचे केवळ १७ टक्के काम पूर्ण झाले आहे.
त्यातच मागील चार वर्षांपासून प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वास आता मे २०२८ उजाडणार आहे. मात्र प्रकल्पाला झालेला विलंब, मच्छिमारांच्या मागणीमुळे प्रकल्पाच्या आराखड्यात केलेले बदल, तसेच जुहू वर्सोवा कनेक्टरचा विस्तार यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.