ह्यांच्या जेवणाचा खर्चही केंद्रानेच करावा, राज्यातील मंत्र्यांवर भाजपचा प्रहार
By महेश गलांडे | Published: November 18, 2020 04:28 PM2020-11-18T16:28:06+5:302020-11-18T16:34:12+5:30
उद्धव ठाकरे हे भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपदावर बसले, हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही, पिंजऱ्यात बसून राहतात.
मुंबई - पालघरमधील साधुंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी भाजपा आमदार राम कदम यांच्याकडून खारपासून ते गडचिंचले गावापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत राम कदम यांना ताब्यात घेतलं, त्यानंतर काही वेळानंतर राम कदम यांची सुटका करण्यात आली, यावेळी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली. नारायण राणेंनी ठाकरे सरकारवरी टीका केलीय.
उद्धव ठाकरे हे भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपदावर बसले, हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही, पिंजऱ्यात बसून राहतात. त्यामुळे राम कदम यांना आंदोलन करावं लागतंय. 212 दिवस होऊनही पालघरचा तपास पूर्ण होत नाही, त्याला विरोध करण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? कुठल्याही परिक्षेला बसत नाही, पास होत नाही, त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असं शिवसेना नेते कायम म्हणतात. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाही, पदासाठी तडजोड करणारे आहेत. त्यामुळे शिवसेना हिंदुत्व असं समीकरण नाही असा टोलाही नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. त्यानंतर, नारायण राणेंनी ट्विट करुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था 'नाचता येईना आंगण वाकडे' अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा अशी मागणी करतील. @bjp4mumbai@BJP4Maharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 18, 2020
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. केंद्राने निधी दिला नाही, केंद्राकडे पैसे बाकी आहेत, असे सांगतात. यावरुन नारायण राणेंनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आणि ठाकरे सरकारवर प्रहार केला. ''राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था 'नाचता येईना आंगण वाकडे' अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा, अशी मागणी करतील.'', अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी राज्यातील मंत्र्यांवर केली आहे.
राम कदमांचीही सरकारवर टीका
राम कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, पालघरमध्ये साधुंच्या हत्येला इतके दिवस झाले तरी कारवाई नाही, हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते, घटनेच्या चौकशीआधीच महाराष्ट्र सरकारने मॉब लिचिंग असल्याचं सांगून टाकलं, सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, याठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशारा त्यांनी दिला.