Join us

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या जबाबदारीचा खर्च वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 9:44 AM

राणीबागेच्या नूतनीकरणादरम्यान २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले.

ठळक मुद्देराणीबागेच्या नूतनीकरणादरम्यान २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. यासाठी राणीबागेत पेंग्विन कक्ष तयार केला आहे

मुंबई :  भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेच्या (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) पेंग्विन कक्षाच्या देखभालीचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले होते. मात्र नवीन संस्थेच्या नियुक्तीस विलंब होत असल्याने पालिका प्रशासनाने जुन्याच कंपनीला दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. या वाढीव कालावधीसाठी पालिका तब्बल ४५ लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने मांडला आहे. मात्र खर्चाला आधीपासून सदस्यांचा विरोध असल्याने यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

राणीबागेच्या नूतनीकरणादरम्यान २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. यासाठी राणीबागेत पेंग्विन कक्ष तयार केला आहे. या पक्ष्यांचे व कक्षाची व्यवस्थापन प्रणाली महापालिकेकडे नसल्याने ११ सप्टेंबर २०१८ रोजी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची ३६ महिन्यांकरिता नेमणूक केली होती. ही मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली. यासाठी मागविलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नवीन कंपनीची निवड न केल्याने प्रशासनाने मुदत संपुष्टात आलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला आणखी ४५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला. हा कालावधी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र अद्यापही नवीन कंपनी न मिळाल्याने स्थायीने २०१८ मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे मुदतवाढ दिली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका