मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीला अखेर सुरुवात होणार आहे़ यात अंधेरी येथील गोखले पूल आणि पूर्व-पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरील दोन उड्डाणपुलांची पुनर्बांधणी, पुलांवरील भार कमी करणे तसेच घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाच्या विस्ताराचा समावेश आहे. मात्र विलंबामुळे पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ झाली आहे़ त्यानुसार या कामांसाठी महापालिका आता ४३७ कोटी रुपये खर्च करणार आहे़
अंधेरी पूर्व येथील गोखले पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन लोकांचा मृत्यू झाला़ तर १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल पडून सात लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे मुंबईतील धोकादायक पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ हिमालय पूल फिट ठरविण्यात आला होता़ त्यामुळे या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा एकदा आॅडिट करण्यात आले़ त्यानुसार २१ पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे़अंधेरी पूर्व येथील गोखले पुलाच्या बांधकामासाठी १३८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा पूल २६५ मीटर लांबीचा आणि २६.८ मीटर रुंदीचा असेल. (दोन्ही बाजूंना १.५ मीटरचे पदपथ) पूल आरसीसी स्ट्रक्चर आणि स्टिल गर्डरच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वीचा ८९ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च होता़
सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. विमानतळावर जाण्यासाठी या रस्त्याचा वापर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती करीत असतात. मात्र या जोडरस्त्यावरील दोन्ही पूल जीर्ण झाल्यामुळे ते पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत.मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या जोडरस्त्याच्या कामांतर्गत संबंधित प्राधिकरणाकडूनच हे काम करून घेतले जाणार आहे. या पुलाची रुंदी ४५.७ मीटर व लांबी ११० मीटर असून यासाठी ४५.०७ कोटींचा खर्च केला जाणार आहे.येथे केले जाणार वाढीव कामघाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर शिवाजीनगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डम्पिंग ग्राउंड जंक्शनपर्यंतच्या उड्डाणपुलाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य उड्डाणपुलाच्या अबुटमेंट-ए-२ पासून ते मोहिते-पाटील येथील भुयारी वाहतूक मार्गापर्यंत उड्डाणपुलाचे काम विस्तारित करण्यात येणार आहे. मात्र या कंत्राटाच्या किमतीत २४६ कोटींची वाढ झाली असून, एकूण कंत्राटाची किंमत ७१३ कोटींवर गेली आहे.पुलांचा भार कमी करणारपश्चिम रेल्वेवरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट रेल्वे प्रशासनाने आयआयटी, मुंबईकडून करून घेतले होते. यानुसार पी आणि आर विभागातील पूल मार्गिकेचे थर पूर्णपणे स्क्रॅपिंग करून त्यावर मास्टीक अस्फाल्टचे थर चढविण्यात येणार आहेत़ यामुळे पुलाच्या स्लॅबवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. गोरेगावपासून बोरीवलीपर्यंतच्या चार पुलांचे काम केले जाणार आहे. या कामांसाठी चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़