Join us

हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा खर्च ५१ वरून ७७ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:59 AM

काम रखडल्याचा फटका; खर्चात झाली तब्बल २६ कोटींची वाढ

मुंबई : माझगाव येथील ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाचे काम रखडल्यामुळे पुनर्बांधणीचा खर्च २६ कोटींनी वाढला आहे. धोकादायक ठरलेला हा पूल २०१६ मध्ये पाडण्यात आला, तेव्हा पुलाच्या कामाचा अंदाजित खर्च ५१ कोटी रुपये होता. मात्र आता हा खर्च ७७ कोटींवर पोहोचला आहे. लोखंडी गर्डरच्या वजनात वाढ आणि पायाभरणीसाठी अतिरिक्त काम केल्यामुळे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच खर्च वाढल्यामुळे या प्रस्तावावर फेरविचार करण्याची उपसूचना भाजपने मांडली. परंतु, शिवसेनेने बहुमताच्या जोरावर ही सूचना फेटाळून लावत प्रस्ताव मंजूर केला.माझगाव-सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान असलेला हँकॉक पूल १४१ वर्षे जुना आहे. त्यावरील सततच्या रहदारीमुळे हा पूल धोकादायक झाला होता. त्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये मध्य रेल्वेने हा पूल पाडला. त्याजागी पर्यायी नवीन पूल उभारण्याबाबत योग्य नियोजन न झाल्याने या पुलाचे काम रखडले.या पुलाच्या बांधकामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार रस्ते घोटाळ्याच्या काळ्या यादीतील असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर पालिकेने फेब्रुवारी २०१८ मध्ये निविदा मागवून १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले.मात्र नियुक्त केलेल्या कंत्राट कामांमध्ये लोखंडी गर्डर्सचे एकूण वजन ६६० मेट्रिक टन इतके होते. रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्त्वातील आयएएस कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाइन बदलण्याची सूचना केली. त्यानुसार गर्डर्सचे वजन वाढवून ते ६६० ऐवजी १३७४ मेट्रिक टन एवढे करण्यात आले. त्यामुळे २० कोटी ७६ लाखांनी खर्च वाढला.तसेच क्राँक्रिट खोदकामाची खोली १-डी ऐवजी ३-डी करण्यात आल्याने ती दहा मीटरने वाढली. त्यामुळे खर्च वाढला आहे. याशिवाय एमएस लाइन तसेच काँक्रिट पाइल कॅपचा आकार वाढल्यामुळे विविध करांसह २५ कोटी ७१ लाख रुपयांनी हा खर्च वाढला आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.भाजपची उपसूचना फेटाळलीठेकेदाराला कामाचा अंदाज आधी आला नाही का? खर्चात वाढ होत असल्याने हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविण्याची उपसूचना भाजपचे सदस्य प्रभाकर शिंदे यांनी मांडली. मात्र ही उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मताला टाकली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीने शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्यामुळे उपसूचना फेटाळून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.माझगाव-सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान रेल्वेवरील हा महत्त्वाचा पूल १८७९ मध्ये ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. १९२३ मध्ये म्हणजेच ४४ वर्षांनंतर या पुलाचे नव्याने काम करण्यात आले.गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता. रहदारी वाढल्यामुळे वयोमानानुसार धोकादायक झालेला हा पूल जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला.