काम सुरू होण्यापूर्वीच वाढला ‘हँकॉक’चा पुनर्बांधणीचा खर्च; खर्चात झाली २५ कोटींची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:34 AM2020-02-04T01:34:45+5:302020-02-04T06:26:02+5:30

काम रखडल्याचा फटका

The cost of rebuilding 'Hancock' increased before work began; Expenditure increased by Rs 25 crore | काम सुरू होण्यापूर्वीच वाढला ‘हँकॉक’चा पुनर्बांधणीचा खर्च; खर्चात झाली २५ कोटींची वाढ

काम सुरू होण्यापूर्वीच वाढला ‘हँकॉक’चा पुनर्बांधणीचा खर्च; खर्चात झाली २५ कोटींची वाढ

Next

मुंबई : अनंत अडचणींमुळे गेली चार वर्षे हँकॉक पुलाचे काम रखडल्यामुळे अखेर पुनर्बांधणीच्या खर्चात तब्बल २५ कोटींची वाढ झाली आहे. २०१६ मध्ये हा पूल पाडल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीला ५१ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात आता हा खर्च ७७ कोटींवर पोहोचला आहे. लोखंडी गर्डरच्या वजनात वाढ आणि पायाभरणीसाठी अतिरिक्त काम केल्यामुळे बांधकाम सुरू होण्याआधीच हँकॉक पुलाचा खर्च तब्बल २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढला आहे.

माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान असलेला हँकॉक पूल १४१ वर्षे जुना आहे. त्यावरील सततच्या रहदारीमुळे हा पूल धोकादायक झाला होता. त्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये मध्य रेल्वेने हा पूल पाडला. मात्र त्या जागी पर्यायी नवीन पूल उभारण्याबाबत योग्य नियोजन न झाल्याने या पुलाचे काम रखडले. या दिरंगाईमुळे ट्रॅक ओलांडताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पण नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी हा पूल लवकरात लवकर बांधण्याची जोरदार मागणी होत आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार रस्ते घोटाळ्याच्या काळ्या यादीतील असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले. यानंतर पालिकेने फेब्रुवारी २०१८ मध्ये निविदा मागवून १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले.

असा वाढला बांधणीचा खर्च

मात्र नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राट कामांमध्ये लोखंडी गर्डर्सचे एकूण वजन ६६० मेट्रिक टन इतके होते. रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्त्वातील आयएएस कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाइन बदलण्याची सूचना केली. त्यानुसार गर्डर्सचे वजन वाढवून ते ६६० ऐवजी १३७४ मेट्रिक टन एवढे करण्यात आले. त्यामुळे २० कोटी ७६ लाखांनी खर्च वाढला. तसेच काँक्रिट खोदकामाची खोली १-डी ऐवजी ३-डी करण्यात आल्याने ती दहा मीटरने वाढली. त्यामुळे खर्च वाढला आहे. याशिवाय एमएस लाइनर्स तसेच काँक्रिट पाइल कॅपचा आकार वाढल्यामुळे विविध करांसह २५ कोटी ७१ लाख रुपयांनी हा खर्च वाढला आहे.

सल्लागाराच्या शुल्कात वाढ

पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक सल्लागार एस.एन. भोबे अ‍ॅण्ड असोसिएट्स, तर फेरतपासणीसाठी आयआयटी, मुंबईची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक सल्लागाराला ६१ लाख ६८ हजार रुपये आणि फेरतपासणीसाठी १० लाख रुपये सल्लागार शुल्क देण्यात येणार होते. वाढीव कामांमुळे तांत्रिक सल्लागाराला २८ लाख २४ हजारांचे शुल्क वाढवून देण्यात येणार आहे.

माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान रेल्वेवरील हा महत्त्वाचा पूल १८७९ मध्ये ब्रिटिशकाळात बांधण्यात आला होता. १९२३ मध्ये म्हणजेच ४४ वर्षांनंतर या पुलाचे नव्याने काम करण्यात आले. गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता. रहदारी वाढल्यामुळे वयोमानानुसार धोकादायक झालेला हा पूल जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला.

Web Title: The cost of rebuilding 'Hancock' increased before work began; Expenditure increased by Rs 25 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.