मुंबई : धोकादायक झालेले मुंबईतील काही उड्डाणपूल आणि रेल्वेमार्गावरील काही पुलांच्या दुरुस्तीचे कार्यादेश दोन वर्षांपूर्वी काढण्यात आले. कोविड काळात गेले वर्षभर ही कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे वरळी, परळ, वडाळा, शीव येथील उड्डाणपूल व रेल्वेमार्गावरील पुलांच्या दुरुस्ती कामांचा खर्च १७ कोटी २६ लाखांवरून २७ कोटींवर पोहोचला आहे. परिणामी, महापालिकेला तब्बल दहा कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुंबईतील काही पुलांच्या दुरुस्तीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापालिकेने कार्यादेश दिले होते. या कामांसाठी १७ कोटी २६ लाख रुपये खर्च करण्यात येणार होते. पावसाळ्यासह १५ महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण करण्याची अट निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, मार्च २०१९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
त्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्याच काळात दहिसर येथील स्कायवॉकचा भाग रस्त्यावर पडल्यानंतर मुंबईतील सर्वच स्कायवॉकच्या सर्वेक्षणाचे काम व्हीजेटीआय या संस्थेला देण्यात आले. त्यांच्या शिफारशीनुसार मूळ कामाचा खर्च आणि व्याप्ती वाढली आहे. या पुलांच्या दुरुस्तीला सुरुवात केल्यानंतर वाढीव कामे करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या खर्चात आणखी वाढ होऊ शकते, असे पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
या पुलांची दुरुस्ती रखडली.....
हिंदमाता उड्डाणपूल, प्रभादेवी स्थानकावरील पूल, हाजीअली भुयारी मार्ग, लव्हग्रोव्ह पंपिंग येथील नाल्यावरील पूल, क्लीव्हलॅण्ड बंदर येथील नाल्यावरील पूल, कॉटन ग्रीन स्टेशन येथील पादचारी पूल, सायन स्थानकाजवळील स्कायवॉक, पूर्व द्रुतगती मार्ग उड्डाणपूल, कॉटन ग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉक, परेल टीटी उड्डाणपूल, आप्पासाहेब मराठे मार्ग पादचारी पूल
* पुलांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी २६ लाख २८ हजार रुपये कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, आता नऊ कोटी ९७ लाख ७४ हजार रुपये खर्च वाढणार आहे.