Join us

ऑडिटनंतर सहा पुलांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:05 AM

पाच कोटी २३ लाख रुपयांनी खर्चात वाढलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी येथील हिमालय पादचारी पूल गेल्या ...

पाच कोटी २३ लाख रुपयांनी खर्चात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : छत्रपती शिवाजी येथील हिमालय पादचारी पूल गेल्या वर्षी कोसळल्यानंतर सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटरने या पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचविली होती. प्रत्यक्षात हा पूल कमकुवत असल्याचे आढळून आले. दुरुस्ती सुरू असलेल्या पुलांचेही ऑडिट करण्यात आले. दुरुस्ती खर्चात वाढ झाली आहे. सहा पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल पाच कोटी २३ लाख रुपयांनी खर्च वाढला आहे.

मार्च, २०१९ मध्ये हिमालय पूल कोसळून सात पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर २०१८ मध्ये अंधेरी येथील रेल्वेमार्गावरील गोखले पूल कोसळला होता. पुलांवर अतिरिक्त बांधकामाचा भार वाढल्याने, हे दोन पूल कोसळल्याचा निष्कर्ष यासाठी स्थापन चौकशी समितीने काढला. त्यामुळे पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करून घेतले. त्यात सल्लागारांनी पुलांवरील भार कमी करण्याची शिफारस केली. त्यानुसार, पुलावरील काँक्रिटीकरण कमी करून डांबरीकरण करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, सुरक्षा भिंत काढून बॅरिअर बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, हे ऑडिट होण्यापूर्वी पालिकेने दादर आणि माहीम परीसरातील सहा पुलांच्या दुरुस्तीसाठी कंत्राट दिले होते. आठ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार होते. वाढीव कामामुळे पाच कोटी २३ लाख रुपये खर्च वाढला आहे. या सहा पुलांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

* पुलांवरील अतिरिक्त बांधकामांचा भार कमी करण्यासाठी संरक्षक भिंत काढून, त्या ठिकाणी कमी वजनाची मेंटल क्रॅश बॅरिअर बांधण्यात येणार आहेत.

* या वाढीव खर्चाला मंजुरी मिळण्यासाठी पालिकेने तीन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला होता. मात्र, तेव्हा सदस्यांनी आक्षेप घेतल्यामुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.