महामार्गावर वेग वाढवल्याची किंमत ८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:09 AM2021-09-08T04:09:47+5:302021-09-08T04:09:47+5:30
मुंबई : भरधाव वेगाने वाहन चालवणे हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. देशात हजारो लोकांचा मृत्यू हा भरधाव वेगाने ...
मुंबई : भरधाव वेगाने वाहन चालवणे हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. देशात हजारो लोकांचा मृत्यू हा भरधाव वेगाने होतो. असे असले तरी मुंबईकरांना भरधाव वेगाचा मोह आवरताना दिसत नाही. ‘स्पीडगन व्हॅन’मुळे धावत्या गाडीचा वेग मोजण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. २०२१ या वर्षात ८४ हजार जणांनी भरधाव वेगाने वाहन चालवले आहे.
त्यांच्याकडून वेग वाढवल्याची किंमत ८ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईत दरवर्षी ८ हजार सरासरी अपघात अधिक वेगाने गाडी चालवल्याने होतात. त्यामानाने स्पीड गन कॅमेरा ही प्रणाली मुंबईत कमी प्रमाणात आहे असे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सांगतात. पण स्पीडगन ही प्रणाली लावल्यापासून मुंबईत अधिक वेगाने वाहन चालवून झालेले अपघात कमी प्रमाणात होत आहेत, असेदेखील सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या प्रणालीच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावला आहे. या प्रणाली अगोदर सुसाट गाड्यांनी अनेक अपघात शहरात घडले, ते चित्र कमी झाल्याचे सध्या दिसत आहे.
रस्त्यावरून धावणारे वाहन ३०० मीटरपर्यंत पुढे गेले तरी स्पीडगनने ते कॅच करता येत असल्याने वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करण्याची हिंमत करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
................
महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
महिना दंड
जानेवारी -१ कोटी १९ लाख २२ हजार
फेब्रुवारी -१ कोटी ३५ लाख ३७ हजार
मार्च -२ कोटी २० लाख ७७ हजार
एप्रिल -१ कोटी १८ लाख ७८ हजार
मे- ६९ लाख ६३ हजार
जून -४८लाख २८ हजार
जुलै - ७० लाख ७८ हजार
ऑगस्ट - ६७ लाख ८४ हजार
एकूण - ८ कोटी ४० लाख ६७ हजार
....................
(बॉक्स)
अशी होते कारवाई
पूर्व द्रुतगती मार्गावर ताशी वेगमर्यादा ६० असावी असा नियम आहे. परंतु बहुसंख्य वाहने ८० ते १०० किलोमीटरच्या वेगाने धावत आहेत. जेजे उड्डाणपुलावर वेग मर्यादा ४० अशी आखून दिली आहे. मात्र काही गाड्या ७० ते ८०च्या वेगाने चालायच्या. त्यामुळे अनेक अपघात घडत होते. मात्र आता स्पीडगन प्रणालीमुळे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता महामार्गावर काही प्रमाणात स्पीडगन तैनात करण्यात आले आहेत. त्यानुसार वेग मर्यादा तोडणाऱ्यांवर कारवाई होते.
.............
एसएमएसवर मिळते पावती
महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून दंड वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे स्पीडगनने कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेची पावती एसएमएसव्दारे पाठविण्यात येते. त्यास वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसादही मिळत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून मिळाली.