भारक्षमतेहून अधिक मालाची वाहतूक करणे पडले महागात, २० हजार वाहनांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:22 AM2019-08-22T01:22:59+5:302019-08-22T01:23:37+5:30
मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष परवाना घ्यावा लागतो.
मुंबई : भारक्षमतेहून अधिक माल वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात परिवहन विभागाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, गेल्या १५ महिन्यांत सुमारे १९,२८२ वाहन चालकांवर बडगा उगारला आहे. या कारवाईतून ४५ कोटी रुपयांची दंड वसुली केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष परवाना घ्यावा लागतो. वाहनाच्या वजनक्षमतेनुसार तो जारी केला जातो. मात्र, बरेच वाहनचालक हे क्षमतेहून अधिक माल वाहतूक करतात. त्यामुळे वाहनांच्या ब्रेक सिस्टीममध्ये बिघाड होऊन अपघात होण्याची शक्यता असते. असे प्रकार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ठिकठिकाणी गस्तीनाके उभारून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली.
एप्रिल २०१८ ते जून २०१९ या १५ महिन्यांत तपासणीदरम्यान १९,२८२ वाहने दोषी आढळली. यातील १७,३४८ वाहनांवर कारवाई करून सोडले. ९,९९९ वाहने जप्त केली, तर १६,१७४ वाहनांमधील माल उतरवून ती वाहने सोडून देण्यात आली. या कारवाईत ४५ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.