मुंबई : जलवाहिन्यांना आतून रंग लावण्याच्या कामाचा खर्च तब्बल अडीचशे टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षी या कामासाठी दोन कोटी ६० लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, हे काम काही कारणास्तव रद्द करून सप्टेंबर, २०१९ मध्ये निविदा मागवून देण्यात आले, परंतु या कामासाठी मुंबई महापालिकेला तब्बल ३१ कोटी रुपये जादा खर्च करावे लागणार आहेत. माहितीच्या अधिकारातून ही पोलखोल झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बाब उजेडात आणली आहे. मार्च, २०१८ मध्ये जलवाहिन्यांना आतून रंगकाम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. हे काम एपीआय सिव्हिल कंपनीला दोन कोटी ६०लाख रुपयांत देण्यात येणार होते. मात्र, काम पालिकेकडून रद्द करून त्यात नवीन काम जोडत ४४ कोटी ८१ लाख रुपयांच्या नवीन निविदा या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात काढण्यात आली. यावेळेसही याच कंपनीला या कामाचे कंत्राट मिळणार आहे. कोटिंग, वाहिन्यांची सफाई अशी नवीन कामे जोडण्यात आल्यानंतर दीड वर्षांत खर्चामध्ये अडीचशे टक्क्यांची वाढ झाल्याचे माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नामुळे उजेडात आले आहे.काढण्यात आलेल्या दोन्ही निविदांमध्ये हमी कालावधीत कोणताही फरक नसून सुनियोजित पद्धतीने कामाची नवीन निविदाचढ्या दराने काढण्यात आली आहे, असे गलगली यांनी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत, मुंबई महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्य अभियंता (दक्षता) यांना देण्यात आलेआहेत.>मुंबई पालिकेला३१ कोटींचा भुर्दंडयापूर्वी एका क्युबिक मीटर रंगकामासाठी १८५ रुपये मोजावे लागत होते. आता या किमतीत ४६३ रुपयांची वाढ झाल्यामुळे पालिकेला एकूण ६४८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेला या व्यवहारामुळे तब्बल ३१ कोटी रुपयांचा भुर्दंड पडणार आहे.
जलवाहिन्यांच्या रंगकामाचा खर्च वर्षभरात अडीचशे टक्क्यांनी वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:51 AM