Join us  

कोविड काळातील खर्चाचा हिशेबच नाही; प्रशासनाचे चौकशीत असहकार्य, कॅग अहवालात नमूद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 6:31 AM

ऑडिटसाठी पुन्हा रेकॉर्ड मागितले, तेव्हा विधी व न्याय प्राधिकरणाकडे हे प्रकरण अभिप्रायासाठी पाठवले, असे कॅगचे म्हणणे आहे.

मुंबई : पालिकेने कोविड काळात पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. पालिकेने कोविड काळात केलेल्या खर्चाचा हिशेब दिलेला नाही. तसेच पालिका प्रशासनाने चौकशीत सहकार्य केले नसल्याचे कॅग अहवालात नमूद आहे.

कोविड व्यवस्थापनाशी संबंधित रेकॉर्ड तयार करण्यासाठी पालिकेला निर्देश देण्यासाठी राज्य सरकारला कॅगकडून वारंवार स्मरणपत्रे देऊनही, पालिकेकडून ऑडिटसाठी हे रेकॉर्ड तयार केले गेले नाहीत. उलट  १८९७च्या महामारी रोग कायदा आणि २००५च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पालिकेने कॅगला नोटीस पाठवत या खर्चाची कागदपत्रे सादर करण्यास असमर्थता दाखवली. ऑडिटसाठी पुन्हा रेकॉर्ड मागितले, तेव्हा विधी व न्याय प्राधिकरणाकडे हे प्रकरण अभिप्रायासाठी पाठवले, असे कॅगचे म्हणणे आहे. एकंदरीतच पालिकेने कोविड काळात किती पैसे खर्च केले त्याचा हिशेब दिला नाही, असे निरीक्षण कॅगने नोंदवले आहे.

 या खर्चाचा ताळमेळ लागेना  

  • कॅग तपासत असलेल्या १२ हजार कोटी रुपयांपैकी ३ हजार ५०० कोटींहून अधिक खर्च कोविड व्यवस्थापनाशी संबंधित आहे. 
  • यामध्ये १३ जम्बो कोविड सेंटर, २४ वॉर्ड कार्यालये, ५ मोठी रुग्णालये, ६ विशेष रुग्णालये, १७ पेरिफेरल रुग्णालये, एक दंत रुग्णालय यांचा समावेश आहे.  
  • याशिवाय विभाग कार्यालये आणि कार्यकारी आरोग्य कार्यालये यांचा देखील यात समाविष्ट आहेत.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्या