मुंबई : दीक्षान्त समारंभात इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेल्या गाऊनचा त्याग करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला असून बुधवारी विद्यापीठात पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सर्वमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त समारंभातून गाऊन हद्दपार होऊन यापुढे भारतीय पोशाख वापरण्यात येणार आहे. यापुढे दीक्षान्त समारंभाचा पोशाख हा भारतीय पद्धतीचा असणार आहे.मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात याआधी काळी टोपी आणि गाऊन घातला जात होता. देश स्वतंत्र होऊनही इंग्रजांच्या पोशाखाचा वापर केला जात होता. पण या वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदव्यांचा पदवी प्रदान सोहळा हा भारतीय वेशात असावा अशी आग्रही मागणी सिनेट सदस्यांकडून होत होती. त्यामुळे यामध्ये बदल केला असून यापुढे भारतीय पोशाख दीक्षान्त समारंभात वापरला जाईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पोशाखाचे स्वरूप काय असावे यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे अधिकार कुलगुरूंना देण्यात आल्याची माहिती मुक्ता शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वैभव नरवडे यांनी दिली.>त्रिसदस्यीय समिती देणार अहवालभारतातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीप्रमाणे तेथील विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात वापरले जाणारे पोशाख आहेत. मुंबई विद्यापीठात केवळ शहरातील नाही, तर राज्यातील विविध ठिकाणचे विद्यार्थी परीक्षा देऊन आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण करीत असतात. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी गठीत केलेली त्रिसदस्यीय समिती महाराष्ट्रातील पारंपरिक पोशाख, रंगसंगती, वापरल्या जाणाºया कापडाचा दर्जा या गोष्टींचा विचार करून अहवाल तयार करून आठवड्याभरात विद्यापीठासमोर सादर करणार आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ या समितीवर नेमले असल्याचे सांगण्यात आले.
दीक्षान्त समारंभाचा पोशाख बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:55 AM