Join us  

मुंबईकरांचा खोकला वाढला

By admin | Published: December 28, 2015 3:13 AM

गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक मुंबईकर सकाळी, रात्री फेरफटका मारायला घराबाहेर पडतात. पण, थंड हवामान आणि प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य नरम-गरम झाले आहे.

मुंबई : गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक मुंबईकर सकाळी, रात्री फेरफटका मारायला घराबाहेर पडतात. पण, थंड हवामान आणि प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य नरम-गरम झाले आहे. खोकला - सर्दीच्या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच मुंबईत गारठा वाढत आहे. ख्रिसमसपासून वाढलेल्या थंडीमुळे सेलीब्रेशन मूडमध्ये असणारे मुंबईकर सुखावले असले तरी खोकून आणि शिंकून बेजार झाले आहेत. खोकला आणि सर्दी हे संसर्गामुळे होत असल्याने त्याची लागण अधिक वेगाने होते. हे टाळण्यासाठी स्वच्छता राखा, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. थंडी अनुभवणाऱ्या मुंबईकरांचा त्रास वाढलेला आहे. सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या रुग्णांना फुप्फुसाचा त्रास असतो, त्यांना थंडीचा अधिक त्रास होतो. ज्यांना त्रास असेल त्यांनी हिवाळा सुरू होण्याआधीच फ्लूची लस घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो; आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव झाल्यास प्रकृती बिघडत नाही. थंडीच्या दिवसांत लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. सर्दी-खोकल्याची लागण होऊ नये म्हणून त्यांना गरम कपडे घातले पाहिजेत, असे फॅमिली फिजिशियन डॉ. शैलजा सिंग यांनी सांगितले. फॅमिली फिजिशियन डॉ. अनिल पाचणेकर यांनी सांगितले, थंडीत अ‍ॅलर्जीचा धोका अधिक असतो. त्यामुळे ब्राँकायटिस, अस्थमासारखे आजार वाढतात. या दिवसांत हवामानातील आर्द्रतेमुळे धुळीकण हवेच्या वरच्या थरात जात नाहीत. ते जमिनीलगतच हवेच्या थरात राहतात. श्वासोच्छ्वास प्रक्रियेमुळे धुळीकण मानवी शरीरात जाऊन खोकला, घसादुखी असे आजार उद्भवतात. अनेकांना खोकला, सर्दी, घसा दुखणे असा त्रास जाणवतो. या दिवसांत कफ, पित्त बाहेर पडण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. (प्रतिनिधी)