Join us

खोकल्याला हाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:06 AM

..................................खोकल्याचा अनुभव न घेतलेला माणूस सापडणे कठीण, इतका हा आजार सर्वसामान्य आहे. परंतु खोकल्याची जास्त भीती निर्माण झाली ...

..................................

खोकल्याचा अनुभव न घेतलेला माणूस सापडणे कठीण, इतका हा आजार सर्वसामान्य आहे. परंतु खोकल्याची जास्त भीती निर्माण झाली ती कोरोनाच्या महासाथीत. म्हणूनच या आजाराविषयी घरगुती उपचारांसहित माहिती असणे आवश्यक आहे.

.................................

फुप्फुसात साठलेला कफ शरीराबाहेर फेकण्याचा निसर्गाने केलेला प्रयत्न म्हणजे खोकला होय.

सर्वसामान्य कारणे-

सतत थंड पाणी वा थंड पेय पिणे, धूर-धूळ, कापसाचे तुकडे श्वसन मार्गात जाणे, तेल-तूप अशा पदार्थांचे अतिसेवन करणे, वातावरणात बदल होणे, विडी-सिगारेट-गुटखा इ. व्यसने असणे, घशातील पडजीभ वाढणे, फुप्फुसे, श्वसननलिका, घसा यात जंतुसंसर्ग होणे इत्यादी खोकल्याची अनेक कारणे आहेत.

दुसऱ्या रोगांचा परिणाम म्हणूनही त्या रोगाचे एक लक्षण म्हणून खोकला येतो. तेव्हा त्या रोगाचा संशय घेऊन तपासण्या व उपचार करणे आवश्यक आहे.

सामान्यतः खोकला १) सुका वा कोरडा २) ओला अशा दोन प्रकारचा असतो.

पुढीलप्रमाणे खोकल्याचे स्वरूप दिसून येते...

अ) कफ अत्यंत कमी असणे वा जवळजवळ नसणेच-

१) सर्दी, फ्लू

२) गोवर

३) पोटात मोठे जंत होणे.

४) विडी, सिगारेट अधिक ओढणे

ब) खोकताना खूप कफ पडणे-

१) दमा

२) न्यूमोनिया

३) श्वसननलिकेत जंतुसंसर्ग होणे(ब्रॉंकायटिस इ.)

४) फुप्फुसांचा लवचिकपणा कमी होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होणे.

क) उबळीसहित आवाज करीत येणारा खोकला-

१) दमा

२) डांग्या खोकला

३) हृदयाचे विविध आजार

४) घटसर्प

ड) दीर्घकाळ व सतत येणारा खोकला-

१) क्षय-टी.बी.

२) जुनाट बॉंकायटिस

३) श्वास घेण्यास सतत त्रास होणे (एम्फीसिमा)

४) दम्यासारखे आजार

५) धूम्रपान अधिक करणे

इ) खोकल्यामुळे येणाऱ्या कफातून रक्त पडणे-

१) क्षय-टी.बी.

२) न्यूमोनिया

३) फुप्फुसाचा कर्करोग

४) पोटात मोठ्या प्रमाणात जंत होणे

५) घश्यात बोटे घालून कफ/पित्त काढताना रक्त पडल्यास लोक फार घाबरतात, परंतु घाबरण्याचे काही कारण नाही. कारण ते रक्त बरेच वेळा स्थानिक असते.

उपाय-

१) खोकला कोणत्या कारणाने, कोणत्या स्वरूपाचा व कोणत्या रोगामुळे येत आहे. यावर लक्ष देऊन त्यानुसार उपचार करावेत.

२) शौचावाटे जंत पडतात का ते पाहावे.

३) सुकलेला कफ पातळ करून बाहेर काढण्यासाठी ,तर कफ अधिक प्रमाणात असेल (ओला खोकला) असेल तर कफ सुकण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी उपाय करावेत.

सुका खोकला -

सामान्य लक्षणे - वारंवार भरपूर खोकल्यावर थोडासा कफ बाहेर पडणे व कफ बाहेर पडल्यावर बरे वाटणे. खोकला रात्री जास्त येणे. खोकताना छाती व कुशीत दुखणे. या लक्षणांबरोबच काही वेळा ताप असणे, तोंड कोरडे पडणे, वारंवार तहान लागणे, आवाज बसणे इ. लक्षणे असतात.

उपाय

यात कफ सुटून बाहेर पडणे महत्त्वाचे असते. म्हणून कफ वाढविणारे व कफ सुटून बाहेर पडण्यासाठी स्निग्ध स्वरूपाचे उपाय करावेत.

१) लवंग तोंडात धरावी.

२) बेहडा भाजून तोंडात ठेवावा.

३) खडीसाखर वारंवार तोंडात ठेवावी.

४) तुळशीच्या २ चमचे रसात २ थेंब तुपाचे टाकून तो रस दिवसातून २/३ वेळा घ्यावा.

५) अडुळसाच्या पिकलेल्या पानांच्या रसात मध व खडीसाखर घालून तो रस २-२ चमचे घ्यावा.

६) जेष्ठमधा(यष्टीमधू)चा तुकडा तोंडात धरून चघळावा वा चावावा. किंवा जेष्ठमधाची पावडर अर्धा ते एक चमचा नुसती पाण्याबरोबर वा तुपाबरोबर घ्यावी.

७) तालीसादी वा सितोपलादी वा एलादी चूर्ण, यापैकी कोणतेही एक चूर्ण १ ते २ ग्राम या प्रमाणात घेऊन ते खावे.

८) एलादी वा लवंगादी वटी, यापैकी कोणतीही एक गोळी २-२ प्रमाणात ३/४ तासांनी चोखून खावी. गरम पाण्याने अंघोळ करावी. अंघोळ करताना छाती, पाठ जास्त पाण्याने शेकावी.

ओला खोकला-

सामान्य लक्षणे

यात खोकल्याबरोबर भरपूर व वारंवार कफ निघतो. तोंडात कफाचे तुकडे सारखे येतात. घसा व तोंड चिकट वाटते. छाती, डोके, हृदय ओल्या कपड्याने गुंडाळल्यासारखे वाटते. याबरोबरच सर्वांग जड वाटते, तोंडाला चव नसते, बरेच वेळा अंगावर शहारे येतात.

उपाय

या प्रकारच्या खोकल्यात कफ सुटणे, त्याची निर्मिती कमी करणारी औषधे देणे महत्त्वाचे असते.

१) १-१ चमचा मध दिवसातून ३/४ वेळा घ्यावा.

२) आल्याचा रस १ चमचा व मध १ चमचा एकत्र करून दिवसातून ३/४ वेळा घ्यावा.

३) कंटकारी वा गोजिव्हादी काढा, यापैकी कोणताही एक काढा २/३ चमचे घ्यावा.

४) सितोपलादी वा तालीसादी वा यष्टीमधू चूर्ण, यापैकी कोणतेही एक वा दोन चूर्णे १ ते २ ग्राम या प्रमाणात मधाबरोबर घ्यावे.

५) द्राक्षासव वा द्राक्षारिष्ट्र यापैकी कोणतेही एक २/३ चमचे जेवणानंतर घ्यावे.

६) च्यवनप्राश एक ते दोन चमचे सकाळी व रात्री घ्यावा.

सुंठ, मिरी, दालचिनी, वेलची, मांसरस यांचा आहारात वापर जास्त करावा. दही, थंड पेये, पोहे, इन्स्टंट पदार्थ खाऊ नयेत.

- डॉ. अंकुश जाधव