Join us

सुट्टीत मामाच्या गावाला जायचं कसं? रेल्वेचे तिकीट मिळेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 06:38 IST

रेल्वेचे आरक्षण सुरू होताच ३ मिनिटांतच फुल्ल

मुंबई : सर्वसामान्य रेल्वेचे तिकीट आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून बुक करतात; मात्र सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी अनेकांना तिकीटच मिळत नाही. कारण बुकिंग सुरू होताच पहिल्या ३ मिनिटांमध्येच ते फुल्ल होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मुंबईतून राज्याच्या इतर भागात तसेच बाहेरच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी मुंबईकरांनी आगाऊ आरक्षण सुरू केले आहे. रेल्वेने बुकिंगसाठी वेबसाईटवर दोन महिने अगोदरचे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी आता २ महिने अगोदरचे तिकीटच मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. 

सिस्टीमवर तिकीट बुकिंग सुरू होताच रिग्रेट असा संदेश दिसत आहे. तसेच जर एजंटकडून तिकीट काढल्यास जास्तीचे पैसे देऊन लगेच कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

३०% आगाऊ आरक्षण रद्द होण्याचे प्रमाण

रेल्वेचे ८५ ते ८८ टक्के प्रवासी २ महिन्यांपूर्वीच आरक्षण करत असल्याने आणि आरक्षण रद्द होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असल्याने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी याचा फायदा प्रवाशांपेक्षा एजंटलाच होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

भारतीय रेल्वेने आगाऊ आरक्षणाची मर्यादा १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणली आहे. १ नोव्हेंबरपासून हा निर्णय लागू केला. त्यासोबतच वेटिंगचा कोटादेखील कमी केला होता.

गेल्या तीन दिवसांपासून कोकणात जाण्यासाठी तिकीट ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सकाळी आठ वाजता साईटवर लॉगिन केल्यावर अगदी काही मिनिटातच बुकिंग फुल्ल होऊन स्क्रीनवर रिग्रेटचा मेसेज दाखवत आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी आम्हाला यावेळी एजंटलाच अधिकचे पैसे देऊन जावे लागणार आहे - सचिन शिवलकर, प्रवासी

बुकिंगमध्ये अनियमितता आढळल्यास तसेच अवैधपणे तिकीट विक्री होत असल्यास कारवाई केली जाते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अधिकृत एजन्टकडूनच प्रवाशांनी तिकीट खरेदी करावे - डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

आम्ही गेल्या आठवड्यापासून तिकीट काढण्याचा प्रयत्न करत आहोत. मेमध्ये लग्नासाठी गावी जायचे आहे. सामान्य प्रवाशाला दाेन महिने आधीचे तिकीट मिळत नाही; मात्र एजंट कन्फर्म तिकीट देतात - ऋषभ शुक्ला, प्रवासी

टॅग्स :मुंबईभारतीय रेल्वेकोकण