ठाणे : महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवक निधीतून तीचतीच कामे पुन:पुन्हा करून या निधीवर डल्ला मारणारे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीला आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चाप लावला आहे. नगरसेवक निधीतून झालेल्या कामांचे प्रगतीपुस्तक आयुक्त जयस्वाल थेट वेबसाइटवर प्रसिद्ध करणार असल्याने आता कोणते काम कधी झाले किंवा कोणत्या कामाची किती प्रगती झालेली आहे, ते जनतेला कळेल आणि त्याचत्याच कामाकरिता निधी मंजूर करवून घेण्यावर अंकुश बसेल.येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊघातल्या आहेत. त्यामुळे सर्वच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील कामे करण्याची घाई लागली आहे. मागील चार वर्षांत जेवढा नगरसेवक निधी राखून ठेवला जात होता, तो १०० टक्के खर्च होत नव्हता. शिल्लक रक्कम पुढल्या वर्षीच्या नगरसेवक निधीत जमा होत असल्याने काही नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील कामे करण्याची शक्कल लढवली आहे. विविध प्रकारची कामे करण्याचे प्रस्ताव नगरसेवक देत आहेत. परंतु, वर्षानुवर्षे एकाच कामांच्या फाइल्स तयार करणे, न झालेली कामे दाखवून निधी लाटणे, कमी खर्चाचे काम असताना जास्तीचे अंदाजपत्रक तयार करणे असे अनेक गैरप्रकार नगरसेवक आणि पालिकेचे काही अधिकारी यांच्या संगनमताने होत होते. या निधीतून केलेल्या कामांचे कोणतेही रेकॉर्ड ठेवले जात नसल्याने गैरव्यवहाराला मोकळे रान मिळत होते. मात्र, आयुक्त जयस्वाल यांनी या गैरव्यवहारांवर अंकुश प्रस्थापित केला आहे. प्रभागामध्ये अमुक एका कामाची गरज असून ते यापूर्वी झालेले नाही किंवा कामाच्या गॅरंटीचा कालावधी संपलेला आहे, असे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंत्याला द्यावे लागणार आहे. कामाचे अंदाजपत्रक, अदा केलेले बिल आणि कामाची गुणवत्ता योग्य असल्याचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेतले जाणार आहे. तसेच, हे काम आपल्या नगरसेवक निधीतून झाल्याचे प्रमाणपत्र नगरसेवकांनाही द्यावे लागणार आहे. ही सर्व प्रमाणपत्रे पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नगरसेवक निधीचे काम पारदर्शी पद्धतीने होऊन भविष्यातले गैरव्यवहारही रोखणे शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, परत उमेदवारी मिळण्याची किंवा निवडून येण्याची शक्यता नसलेल्या नगसेवकांचा बराच निधी शिल्लक असून तो निधी आमच्या प्रभागात द्या, यासाठी अनेक नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, नगरसेवक निधी हा त्या विशिष्ट प्रभागांसाठीच राखून ठेवला असल्याने तो अन्य प्रभागांत वापरता येत नसल्याचे उत्तर लेखा विभागाकडून मिळत असल्याने दुसऱ्या सदस्यांच्या शिल्लक निधीवर डोळा ठेवून असलेल्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. (प्रतिनिधी)शिल्लक निधीवर नगरसेवकांचा डोळा - २०१२-१३ साली २७ कोटी २४ लाखांच्या नगरसेवक निधीपैकी २० कोटी ५६ लाख रु पये खर्च झाले होते. २०१३-१४ साली ३५ कोटी ८३ लाखांपैकी २३ कोटी ३८ लाख खर्च झाले. - २०१४-१५ मध्ये ४२ कोटी ८० लाखांपैकी २४ कोटी ६१ लाख, तर मागील वर्षी ४८ कोटींपैकी २९ कोटी ६८ लाख खर्च झाले होते. मागील चार वर्षांतला जवळपास २१ कोटी रु पयांचा शिल्लक निधी आणि यंदाचे जवळपास ३० कोटी असे ५१ कोटी ६१ लाखांचा नगरसेवक निधी यंदा उपलब्ध आहे. त्यामुळे नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी बककळ रक्कम खर्चाला मिळणार आहे. अशा वेळी या पैशांची उधळमाधळ रोखण्याकरिता आयुक्तांनी प्रगतीपुस्तकाचे आदेश काढण्याने नगरसेवक हिरमुसले आहेत.
नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक वेबसाइटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 3:38 AM