लसीचे दीड कोटी डोस पडून; लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समुपदेशनही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:41 AM2021-12-22T05:41:07+5:302021-12-22T05:41:53+5:30
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा दीड कोटींचा साठा उपलब्ध असून, याची मुदत ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. सुरुवातीच्या लस उपलब्धतेच्या कठीण काळानंतर आता मात्र साधारण १०-१२ दिवसांनी लसींचा नियमित साठा उपलब्ध होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई, पुणे यांसारख्या शहरात पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण शंभर टक्के पूर्ण होत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
लोकांनी लसींचे दोन्ही डोस घ्यावेत यासाठी जनजागृती करणे, काही ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
नवीन वर्षांत १६ जानेवारीला मोहिमेची वर्षपूर्ती
- ७ कोटी ८९ लाख ६३ हजार ५७९ म्हणजे ८६.१९ टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
- ४ कोटी ९४ लाख ५६ हजार ३०५ म्हणजेच ५३.५६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
समुपदेशनही सुरू
‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचारी घराेघर जाऊन, तत्काळ नोंदणी करून लसीकरण करीत आहेत. जे नागरिक लसीकरणासाठी पोहोचत नाहीत अशा नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना प्रोत्साहित करतात. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून अलिकडे राज्यात ९ ते १० लाखांच्या दरम्यान नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी २४६०५३३
फ्रंटलाइन कर्मचारी ४०९६८४३
१८ ते ४४ ७००२३३३३
४५ हून अधिक ५१८३९१७५