लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळकरी मुलांना मादक पदार्थांचे व्यसन व विक्रीच्या गैरमार्गात गुंतविणाऱ्या एकाला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने शनिवारी (दि. १०) अटक केली. त्याच्या संपर्कात असलेल्या १५ पेक्षा जास्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना यापासून दूर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या.
माहीम परिसरात ड्रग्ज तस्करीच्या कामात लहान मुलांचा वापर केला जात आहे, अशा अनेक तक्रारी तेथील नागरिकांनी एनसीबीच्या कार्यालयाकडे केल्या होत्या. त्यामुळे पथकाने शनिवारी या परिसरात सापळा रचून वसीम शमीम नागोर या तरुणाला अटक केली. त्याच्याकडील चरस जप्त केले. चौकशीमध्ये तो ड्रग्ज विक्रीसाठी परिसरातील लहान मुलांचा वापर करीत असलेल्या झोपडपट्टीतील १५ पेक्षा अधिक मुलांना व त्यांच्या पालकांना एकत्र करून त्यांच्याकडे विचारणा केली. या गैरकृत्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुलांचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यांच्या पालकांना औषधांच्या दुष्परिणामांविषयीही माहिती देण्यात आली.