प्रस्ताव गटनेत्यांच्या पटलावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मलबार हिल येथील प्रसिद्ध कमला नेहरू उद्यानात दोन वर्षांपूर्वी महापालिकेने प्रमोद नवलकर व्ह्युविंग गॅलरी तयार केली आहे. राणीचा कंठहार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरिन ड्राइव्हचा मनमोहक नजारा पर्यटकांना या प्रेक्षक दालनातून पाहता येतो. या दालनात पर्यटकांना सशुल्क प्रवेश देण्याचा प्रस्ताव २०१८ पासून चर्चेत आहे. मात्र हा विषय सध्या गटनेत्यांच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
नेहरू उद्यानात असलेल्या या गॅलरीतून गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्हचे विहंगम दृश्य दिसते. संध्याकाळी पथदिवे लागल्यानंतर हा परिसर राणीच्या कंठहारासारखा दिसून येतो. त्यामुळे हा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. क्वीन नेकलेस म्हणजेच राणीच्या कंठहाराचे चांगले दर्शन होण्यासाठी महापालिकांनी या ठिकाणी दुर्बीणही बसवली आहे. या दालनासाठी महापालिकेने आतापर्यंत दहा कोटी रुपये खर्च केले आहेत.
या दालनात प्रवेश देण्यासाठी पर्यटकांना ठरावीक शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी चर्चेत होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. लवकरच या दालनाच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र सध्या महापालिकेची आर्थिक बाजू नाजूक असल्याने हा भार उचलण्यासाठी प्रेक्षक गॅलरीकरिता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे.
* १६ वर्षांवरील प्रत्येक भारतीय पर्यटकास २० रुपये तर परदेशी पर्यटकास ५० रुपये द्यावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.
* या दालनात दररोज सरासरी एक हजार पर्यटक येतात. सुट्टीच्या दिवशी दीड हजार पर्यटक हजेरी लावतात.