प्राणप्रतिष्ठेचे काउंटडाऊन सुरू, खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग : बाजारपेठा गजबजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 07:22 AM2017-08-21T07:22:15+5:302017-08-21T07:22:19+5:30

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असलेल्या मुंबईकरांची रविवारी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. रविवारचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भरपावसातही बाप्पाचा आगमन सोहळा धूमधडाक्यात साजरा केला. तर घरगुती गणपतींसह सार्वजनिक उत्सवांच्या तयारीसाठी दादर, लालबाग, गिरगाव, चेंबूर, कुर्ला येथील प्रमुख बाजारपेठांसह बोरीवली, मानखुर्द, मालाड, घाटकोपर येथील लहान बाजारांमध्येही रविवारी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती.

 Countdown to Pranpratishtha, Shopping for Mumbaikars: Markets Gazabjali | प्राणप्रतिष्ठेचे काउंटडाऊन सुरू, खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग : बाजारपेठा गजबजल्या

प्राणप्रतिष्ठेचे काउंटडाऊन सुरू, खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग : बाजारपेठा गजबजल्या

Next

अक्षय चोरगे  
मुंबई : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असलेल्या मुंबईकरांची रविवारी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. रविवारचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भरपावसातही बाप्पाचा आगमन सोहळा धूमधडाक्यात साजरा केला. तर घरगुती गणपतींसह सार्वजनिक उत्सवांच्या तयारीसाठी दादर, लालबाग, गिरगाव, चेंबूर, कुर्ला येथील प्रमुख बाजारपेठांसह बोरीवली, मानखुर्द, मालाड, घाटकोपर येथील लहान बाजारांमध्येही रविवारी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती.
बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी विविध पोशाखांसह सजावटीचे साहित्य, मखर, दागिने, पडदे, रोषणाईसाठी इलेक्ट्रीक मटेरियल, रांगोळ्या, कागदी व प्लॅस्टिकची फुले, हार या सर्व वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. बाप्पाच्या आगमनापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबईकरांसाठी हा खºया अर्थाने ‘शॉपिंगवार’ ठरला.
पावसाच्या संततधारेमुळे सकाळी बाजारपेठांमध्ये तुरळक गर्दी होती. मात्र दुपारच्या सत्रात पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर मुंबईकरांनी बाजारपेठांवर कब्जा केला होता. सायंकाळी तर दादर आणि कुर्लासारख्या बाजारपेठांत पाय ठेवायलाही जागा नव्हती.
जीएसटीमुळे अनेक वस्तू गतवर्षीच्या तुलनेत महागल्याचे अनेक विक्रेत्यांसह ग्राहकांनी सांगितले. मात्र गणेशभक्तांवर त्याचा तितकासा परिणाम दिसला नाही. बाप्पाचे दागिने आणि पोशाखांमध्ये शेला, फेटा, पितांबर, उपरणे; तर दागिन्यांमध्ये कंठीहार, मोत्यांच्या माळा, मुकुट, कर्णफुले अशा विविध आभूषणांनी दुकाने नटलेली आहेत. दागिने आणि पोषाखांसह मिठाई दुकानांवरही गणेशभक्तांची गर्दी दिसत आहे. बाप्पाच्या लाडक्या मोदकांसह पेढे, बर्फी, लाडू, हलवा आणि इतर गोडधोड पदार्थ खरेदीकडे गणेशभक्तांचा कल दिसत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

काचेच्या मण्यांच्या माळा
दरवर्षी फुलांच्या मागणीप्रमाणे प्लॅस्टिक फुलांच्या माळांनाही ग्राहकांकडून पसंती मिळते. यंदा काचेच्या माळांना आणि मोत्यांच्या माळांना ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ५० ते १ हजार रुपयांपर्यंतच्या किमतीच्या माळा बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. विजेच्या हलक्या प्रकाशातही या माळा चमकत असल्याने ग्राहकांकडून जास्त
मागणी आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गोंड्यांनी नटलेले कंठीहार!
गणपतीच्या अलंकारांमध्ये पारंपरिक कंठीहारासोबत यंदा कापसाचे कंठीहार विशेष आकर्षण ठरत आहेत. ११ कंठ्यांचा हार ८० जे १०० रुपये आणि २२ कंठ्यांचा हार १५० ते १८० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. लाल आणि गुलाबी गोंड्यांचा वापर केल्याने कापसाचे कंठीहार अधिक मनमोहक वाटत आहेत.

इकोफ्रेंडली ‘रिसायक्लेबल’ मखरांना पसंती
गोराई येथे गेल्या ३ वर्षांपासून इकोफ्रेंडली ‘रिसायक्लेबल’ मखर बनवले जातात. मखरामध्ये थर्माकोलऐवजी प्रामुख्याने पुठ्ठा आणि पुन्हा वापरात येणाºया प्लॅस्टिकचा वापर केला जातो. तसेच मखरांमध्ये वेगवेगळ्या १५ प्रकारच्या कलर लायटिंगची व्यवस्था केली आहे. ओम आसन, मोदक आसन, गणेश आसन, लक्ष्मी-सरस्वती आसन, सप्तरंगी आसन, ए आणि बी महाराजा आसन अशा प्रकारची दर्जेदार आसने उपलब्ध आहेत.

पावसामुळे घ्यावी लागली दक्षता : रविवारी दिवसभर पडलेल्या पावसाच्या संततधारेमुळे गणेशमूर्ती चित्रशाळेतून मंडपात आणताना त्या प्लॅस्टिकने झाकून नेण्याची खबरदारी कार्यकर्त्यांना बाळगावी लागली. पावसामुळे वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकांचा वेग आणखीनच कमी झाला होता. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कायम होता.

लाडू, मोदकांवर ताव!
गणपतीला आवडणाºया लाडू आणि मोदकांनी मिठाईची दुकाने भरलेली आहेत. बाप्पाची प्रतिष्ठापना होण्याआधीच गणेशभक्त या मिठायांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे दुकानदारांनीही ४०० रुपयांपासून ते १ हजार ५०० रुपये प्रति किलो दराने विविध प्रकारचे लाडू आणि मोदक दुकानांमध्ये उपलब्ध केले आहेत.

थर्माकोलचीच ‘चलती’
बाजारांमध्ये थर्माकोल आणि इकोफ्रेंडली मखरे उपलब्ध आहेत. पर्यावरणासाठी प्रतिकूल असणाºया थर्माकोलचा वापर टाळा, असे आवाहन पर्यावरणस्नेहींकडून सातत्याने होत आहे. मात्र इकोफ्रेंडली मखरांच्या दुकानांची वानवा आणि किमतींमधील तफावतीमुळे ग्राहकांची पसंती थर्माकोलला मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. थर्माकोलवरील जीएसटीमुळे मखरांच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे.

पारंपरिक उपरण्यांना पसंती
गणेशमूर्तींना अधिक लोभस करणाºया पारंपरिक उपरण्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ४० ते १०० रुपये किमतीच्या उपरण्यांच्या किमतीत गणेशमूर्तींच्या उंचीप्रमाणे फरक आहे. सोनेरी, चंदेरी आणि चमकदार लेसचा वापर करून कलाकारांनी उपरण्यांना अधिक आकर्षक बनवले आहे.

दोन दिवसांत पडलेल्या संततधारेने बाप्पाच्या आगमन सोहळ्यातील बघ्यांची गर्दी काही प्रमाणात ओसरली होती. याउलट गणेशभक्तांसह कार्यकर्त्यांच्या उत्साहात मात्र तसूभरही कमतरता दिसली नाही. छोट्या-मोठ्या मंडळांनीही वाजत-गाजतच बाप्पाची स्वारी मंडपांच्या दिशेने रवाना केली.
डीजेला पूर्णपणे बगल दिलेल्या मंडळांनी ताशाच्या आवाजातच बाप्पाला नाचत-गाजत मंडपात आसनस्थ केल्याचे चित्र मुंबापुरीत पाहायला मिळाले.

गणपतीचे फोटो असलेले टी-शर्ट
गणेशोत्सवात पारंपरिक वस्त्रे म्हणून परिधान करणाºया कुर्ते, सदरे यांच्यासह गणपतींचे छायाचित्र असलेल्या टी-शर्टलाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसते. झेंडे, गांधी टोपी आणि फेटे यांना तुफान मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

वर्षभरामध्ये १०० मखरांची मागणी असते. दोन हजारांपासून ते चार हजारांपर्यंत किमतीचे मखर उपलब्ध आहेत. तसेच मखरामध्ये एक फुटापासून ते तीन फुटांपर्यंतची मूर्ती बसू शकते. घडी करून मखर हव्या त्या ठिकाणी नेता येतात. दोन ते तीन वर्षांपर्यंत मखराचा वापर करता येतो. कोकण, पुणे, हैदराबाद, गुजरात या ठिकाणांहून दरवर्षी मोठ्या संख्येने मखरांची मागणी असते.
- पूनम मांडलीक, मखर बनवणाºया कलावंत

Web Title:  Countdown to Pranpratishtha, Shopping for Mumbaikars: Markets Gazabjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.