Join us

आरक्षण सोडतीचे काउंटडाउन सुरू

By admin | Published: September 28, 2016 2:36 AM

महापालिका निवडणुकीला अवघे काही महिने उरले असतानाही प्रभाग फेररचनेमुळे अद्याप नगरसेवक चाचपडत आहेत. गेली पाच वर्षे विकासकाम केलेल्या प्रभागाचा मोठा भाग

मुंबई : महापालिका निवडणुकीला अवघे काही महिने उरले असतानाही प्रभाग फेररचनेमुळे अद्याप नगरसेवक चाचपडत आहेत. गेली पाच वर्षे विकासकाम केलेल्या प्रभागाचा मोठा भाग फेररचनेत उडाल्याची कुणकुण लागल्याने आधीच नगरसेवक धास्तावले आहेत. त्यात आरक्षणात प्रभागच हातून निसटण्याचे टेन्शन आहे. यापैकी अनेकांचे राजकीय भवितव्य निश्चित करणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीचे काउंटडाउन सुरू झाल्याने नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे.२०१७मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीत आपले नशीब पुन्हा एकदा आजमविण्यासाठी आजी, माजी, इच्छुक हौशे-नौशे-गौशे तयारीला लागले आहेत. मात्र प्रभाग फेररचना आणि आरक्षणाचे दुहेरी संकट त्यांच्यापुढे आहे. प्रभागांची फेररचना अद्याप जाहीर झालेली नाही, तरीही आपले राजकीय वजन वापरून अनेकांनी आपल्या प्रभागातील बदल व फेररचनेत वाट्याला आलेल्या प्रभागांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.मात्र फेररचनेतून कसेबसे निभावले तरी आरक्षणाच्या सोडतीनंतरच यापैकी किती जण शर्यतीत कायम आहेत, हे स्पष्ट होणार आहे. ही सोडत सोमवारी दु. ३ वाजता रंगशारदा सभागृहात जाहीर होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची धाकधूक कमालीची वाढली आहे. ५० टक्के महिला आरक्षणात ११४ प्रभाग, अनुसूचित जाती व जमातीकरिता १५ प्रभाग, दोन अनुसूचित जमातीसाठी असे एकूण १३१ प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)विद्यमान नगरसेवक धास्तावलेगेल्या आरक्षणात काहींनी आजूबाजूच्या प्रभागात जागा मिळवून तर काहींनी आपल्या पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवून अशा पद्धतीने आपला प्रभाग राखून ठेवला होता. मात्र या वेळेस आरक्षणात अशी संधी त्यांना पुन्हा मिळेलच, असे नाही. त्यामुळे प्रभाग हातून गेल्यास राजकीय कारकिर्द वाचविण्यासाठी अन्य कोणते मार्ग आहेत का, याची चाचपणी अनेक जण करीत आहेत.खुलू शकते माजी नगरसेवकांचे नशीब२०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी अनेक दिग्गज नगरसेवक आरक्षणात बाद झाले होते. पक्षात व महापालिकेत विविध समित्यांवर पद भूषविणारेही या वेळी गारद झाले होते. यापैकी अनेकांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली होती. त्यानंतर विविध पक्षांनी जनसंपर्काच्या, समन्वयाच्या जबाबदाऱ्या देऊन त्या दिग्गजांचे पुनर्वसन केले होते. गेली पाच वर्षे ही मंडळी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. काउंटडाउन सुरू : पुढच्या सोमवारी ३ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांपुढे चित्र स्पष्ट होणार आहे. या संकटातून प्रभाग वाचल्यास फेररचनेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांची धावपळ, मोर्चेबांधणी, डावपेच सुरू होतील. त्यामुळे निवडणुकीला खरी रंगत येणार आहे.मुंबईत एकूण २२७ प्रभाग आहेत. यापैकी ५० टक्के म्हणजेच ११४ प्रभाग महिला राखीव असून, १५ प्रभाग अनुसूचित जाती तर दोन अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. पुरुष व महिला वर्गात इतर मागासवर्गीय प्रभागांचे आरक्षण होणार आहे.