मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून अनेक जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली. तसेच, राज्य आणि केंद्र सरकारवरही त्यांनी पत्रकार परिषदेतून निशाणा साधला. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. आरक्षण गेलं तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं?, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला.
एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मराठा आरक्षणआंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. विशेषत: बीड जिल्ह्यात आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आल्याने त्याची गंभीर दखल गृह विभागाला घ्यावी लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाजातील आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण गेले, तेव्हा हेच मुख्यमंत्री होते, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. न्या. शिंदे समितीचं काम सुरू असून दुसरीकडे क्युरेटीव्ह पिटीशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातही आरक्षणावर अभ्यास केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, मराठा समाज बांधवांनी थोडा संयम बाळगला पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. राज्यातील हिंसक आंदोलनावर भाष्य करताना, त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत आहे. आंदोलनात हिंसाचार घडवण्यासाठी काही समाजकंटक सहभागी होत आहेत, त्यांच्यावर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना लक्ष ठेवलं पाहिजे, असेही शिंदेंनी म्हटलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत राज्य सरकार सकारात्मकतेने पावलं उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बांधिल आहे. त्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषकरून ज्याप्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळली. काही विशिष्ट्य समाजाच्या लोकांना टार्गेट कर. हॉटेल, दवाखाने जाळ, प्रतिष्ठान जाळ, अशा प्रकारची कृत्यं केली आहेत.