Join us

राज्यसभेसाठी दावे-प्रतिदावे सुरू; भाजपकडून आमदार फोडण्याचे काम सुरू, राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 7:17 AM

आमचे निवडणूक जिंकण्याचे गणित पक्के झाले आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुंबई : राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमचे निवडणूक जिंकण्याचे गणित पक्के झाले आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला, तर भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते  संजय राऊत यांनी केला. 

पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्हाला आमदारांना कुठे बंदिस्त करण्याची गरज नाही. आमचा त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास आहे. आमदारांवर आम्ही कशाला दबाव आणू. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेऊन आमदार फोडण्याचे काम करीत आहोत, असे संजय राऊत म्हणतात. ते त्यांनी सिद्ध करावे. वाटेल ती चौकशीही करा. 

राऊत म्हणाले की, आम्ही उमेदवार मागे घेणार आहोत, अशा चर्चा कुठून सुरू झाल्या, याचे सूत्रधार कोण आहेत, आम्हाला माहीत आहे. केंद्रात तुमचे सरकार आहे, तसे राज्यात आमचे सरकार आहे. मुख्यमंत्री, आमदार आणि आमचा चांगला समन्वय आहे. राजकीय पक्षाच्या आमदारांना मत दाखवायचे असते. बाकी लढाई अपक्ष आणि छोट्या पक्षांशी आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची विकासकामे केली आहेत. हे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत जोडले गेले आहेत, असा दावा राऊत यांनी केला. 

हे आमदार काय करणार? 

विधानसभेत लहान पक्षांचे १६, तर अपक्ष १३ आमदार आहेत. ते कोणासोबत जातील यावर निकाल अवलंबून असेल. बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, मनसे १, रासप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, जनसुराज्य पार्टी १, शेतकरी कामगार पक्ष १ आणि कम्युनिस्ट पक्ष १ असे लहान पक्षांचे संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत:चे दोन, तर शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे, पण तिसऱ्या व दुसऱ्या जागेसाठी  इतरांची मदत लागेल.

टॅग्स :राज्यसभासंजय राऊतचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपामहाविकास आघाडी