Join us  

बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा, एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 2:16 AM

बँक अधिकाऱ्यांना खोट्या नंबरची स्लीप आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला.  एचडीएफसी बँकेच्या जोगेश्वरी शाखेतील डेप्युटी मॅनेजर अभिषेक सोनी यांनी या संबंधात तक्रार दाखल केली आहे.

- गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा जमा करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी ओशिवरा परिसरात उघडकीस आला असून, याप्रकरणी बँकेच्या तक्रारीवरून खातेधारकाच्या विरोधात ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. बँक अधिकाऱ्यांना खोट्या नंबरची स्लीप आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला.  एचडीएफसी बँकेच्या जोगेश्वरी शाखेतील डेप्युटी मॅनेजर अभिषेक सोनी यांनी या संबंधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या या संबंधातील माहितीनुसार, बँकेचे एटीएम असलेल्या ठिकाणीच हे सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) असून, त्यात जमा रक्कम बँकेचे असिस्टंट मॅनेजर आकाश मिश्रा यांच्या देखरेखीत काढली जाते. त्यानुसार २१ ऑगस्टला रक्कम काढण्यासाठी मिश्रा तेथे गेले. तेथे मशीनमध्ये त्यांना एकूण रकमेच्या दोन स्लिपा मिळाल्या, त्यात एक स्लीप खऱ्या भारतीय चलनाची व दुसरी खोट्या नोटांशी संबंधित होती. सोनी यांनी ती स्लीप पाहिली तेव्हा त्यामध्ये २ हजार रुपयांच्या पाच भारतीय नोटांचे सिरीयल नंबर त्यावर नमूद होते. जे सोनी यांनी पोलिसांना दिले आहेत.

आईच्या खात्यावर नाही आले पैसे...    बँकेत त्याच दिवशी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान एक २५ ते ३० वयोगटातील इसम आला. त्याने माझ्या आईच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, अशी तक्रार केली.     त्यावर बँक अधिकारी निशा सावंत यांनी त्याला तुमच्या खात्यावर खोट्या नोटा जमा झाल्या आहेत, असे सांगितले. मात्र, यावर काहीही न बोलता तो इसम तिथून निघून गेला, त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी ‘त्या’ नोटा डिपॉझिट सदर बनावट नोटांची रक्कम १९ ऑगस्ट रोजी रात्री १०:५९ वाजण्याच्या सुमारास डिपॉझिट करण्यात आली आहे. हे खाते जुबेदा चौधरी या जोगेश्वरीतील महिलेचे आहे. आम्ही भारतीय दंड संहिता कलम ४८९(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :बँक