धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही, पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:35 PM2023-04-13T19:35:10+5:302023-04-13T19:35:44+5:30
हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहातात. त्यामुळे तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उत्तर प्रदेशात अयोध्या दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी, माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवी यांनी हिंदू राष्ट्राची भूमिका मांडली होती. त्यावरुन, राज्याच्या राजकारणात चर्चा झडताना दिसत आहेत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतलीय. मात्र, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे नेते मांडत आहेत. त्यामुळे धर्माच्या नावाने राजकीय पक्ष आता समोरा-समोर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत मांडलेल्या भूमिकेवरुनच या वादाला सुरुवात झालीय.
हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहातात. त्यामुळे तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, पण भारत हिंदू राष्ट्रच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना आम्हाला मान्य नाही या शरद पवारांच्या भूमिकेला फडणवीसांनी थेट अयोध्येतून उत्तर दिलं होतं. आता, राज्यातील भाजप नेते फडणवीसांची री ओढत असून होय हे हिंदू राष्ट्रच आहे, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओ शेअर केलाय तर, इतरही भाजप नेते हिंदू राष्ट्र असल्याचे सांगत फडणवीसांच्या भूमिकेला खो देत आहेत. त्यावर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.
भाजपाकडून आणि नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल मांडण्यात आलेल्या भूमिकेबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. जगात धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात सर्वांचे स्वागत केले जाते. त्यामुळे प्रगतीही त्या वेगाने होते. आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यामुळे देशातील सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मातील विद्वानांचा प्रभाव आहे. अमेरीकेसारख्या देशात कोणत्याही जातीधर्माचा भेदभाव केला जात नसल्याने तो देश प्रगतीपथावर गेला. त्याच पद्धतीने भारताची प्रगती आपण सर्वांनी धर्मनिरपेक्ष विचाराने आजवर करत आलो आहोत. पण, राज्यकर्त्यांमधील काही प्रमुख नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब आहे, असे म्हणत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.
भाजपाकडून आणि नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल मांडण्यात आलेल्या भूमिकेबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. जगात धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत… pic.twitter.com/8SDgisctXx
— NCP (@NCPspeaks) April 13, 2023