Join us

‘देश ईद का जश्न मना रहा है और मै मातम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आज त्योहार है, सारा देश ईद का जश्न मना रहा है, मगर एक माँ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘आज त्योहार है, सारा देश ईद का जश्न मना रहा है, मगर एक माँ के लिये ये मातम का समय है’, अशी हळहळ फहमीदा अन्सारी यांनी बुधवारी बकरी ईदच्या दिवशी व्यक्त केली. गोरेगावमध्ये एमएमआरडीएच्या इमारतीत स्लॅब अंगावर कोसळून तिचा मुलगा आरसलान अन्सारी (८) याचा दोन आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता. ज्यात अद्यापही पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली आहे.

फहमीदा आणि त्यांचा मुलगा आरसलान या दोघांच्याही अंगावर ९ जुलै, २०२१ रोजी स्लॅबचे प्लास्टर कोसळले. ज्यात आरसलानचा मृत्यू झाला तर फहमीदा या गंभीर जखमी झाल्याने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘मी मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतले. मात्र घरात पाऊल ठेवताच पुन्हा त्या रात्रीचा अपघात आणि रक्तबंबाळ होऊन निपचित पडलेला माझा लेक आरसलान आठवला. ती जागा पाहून कापरे भरले. त्याचे कपडे, खेळणी पाहताना तो येईल आणि मला आवाज देईल असे सारखे वाटत होते.

आसपास बकरी ईदची तयारी सुरू होती आणि मी मात्र तीन ते चार तास गोरेगाव पोलीस ठाण्यात मुलाच्या न्यायासाठी ताटकळत बसली होती. आम्हाला सप्टेंबरमध्ये या खोलीत एक वर्ष होईल. या खोलीचे १२ हजार रुपये आम्ही भाडे घर मालकिणीला देत होतो. त्याचदरम्यान कमकुवत झालेल्या घराबाबत तीन वेळा तक्रारही दिली. मात्र जणू मृत्यूच माझ्या मुलाचा अंत करण्यासाठी सतत आमच्या डोक्यावर दबा धरून बसलेला आणि अखेर त्याने माझ्या आरसलानचा घात केला. माझा लेक आता कधीच परत येणार नाही. मात्र त्याच्या मृत्यूस कारणीभूत घर मालकीण व एमएमआरडीएतील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.

गोरेगाव पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून एमएमआरडीए प्रशासनाला पत्र दिले आहे. ज्यावर उत्तर आले की पुढील कारवाई केली जाईल, असे मला तपास अधिकारी सांगत आहे. गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए इमारतीत ९ जुलै रोजी अमन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील सिलिंगचा स्लॅब कोसळून आरसलान याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यात लोखंडी सळी घुसल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते.

फोटो ओळ: स्लॅब कोसळून मृत्यू झालेला आरसलान अन्सारी.